नगर : ग्राहक दिन बैठकीत तक्रारींचा वाचला पाढा | पुढारी

नगर : ग्राहक दिन बैठकीत तक्रारींचा वाचला पाढा

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात 36 वा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करत विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन ग्राहकांनी अनेक तक्रारीचा पाढा तहसीलदार सतिष थेटेसह सर्व विभागाच्या अधिकार्‍यांकडे वाचला.  अकोले पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार सतीष थेटे यांच्या अध्यक्षतेखाली तर गटविकास अधिकारी राहुल शेळके, प्रभारी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, जिल्हा सचिव रमेश राक्षे आदिंच्या उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
अकोले, देवठाण, सिन्नर रस्त्याचे रूंदीकरणाचे कामात खडीवर माती टाकल्याचे फोटो अधिकार्‍यांना दाखविण्यात आले.

तर कोल्हार घोटी राज्यामार्ग काम अत्यंत संथगतीने चालू असल्याची तक्रार देखील मांडण्यात आली. शिवाय रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तहसिलदार सतीश थेटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना तातडीने सूचना दिल्या.  अकोले आदिवासी गावांमध्ये ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक मुख्यालयात थांबत नाही, पशुधन अधिकारी बर्‍याच गावांमध्ये नसतात, त्यामुळे जनावरांवर खासगी डॉक्टरांकडून महागडे उपचार करावे लागतात, रेशनचे धान्य दर महिन्याला मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. तर लव्हाळवाडी, पाचनई येथील आंगणवाडी बंद असल्याने मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

सेतू कार्यालयात व आधार कार्ड सेंटरला सुरू असलेली लूट, नगर अर्बन बँकेत ठेवलेली रक्कम परत मिळत नाही, ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा, साई अर्पण ट्रॅक्टर कडून सेवा मिळत नाही, शासकीय कार्यालयात राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींचे फोटो लावले जात नाहीत.
विज प्रश्न, कॅनॉल, रस्त्यांच्या तक्रारी, खते व बि-बियाणांमध्ये होत असलेली फसवणूक अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी मांडल्या. याबाबत तहसिलदार थेटे यांनी संबंधित खात्यांना याबाबत सूचना देऊन त्वरीत योग्य सेवा देण्यास सांगितले जाईल.

यावेळी भाजपा. तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, प्रा. सुनिल शिंदे, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, नगरसेवक प्रमोद मंडलिक, राम रूद्रे, ज्ञानेश पुंडे, माधवराव तिटमे, प्रा. रामनाथ काकड, वसंत बाळसराफ, बाळासाहेब बनकर, संतोष मुतडक, अ‍ॅड. राम भांगरे, अ‍ॅड. दीपक शेटे, शोभा दातखिळे, प्रतिभा सूर्यवंशी, अनंत घाणे, सुनिल देशमुख आदी उपस्थित होते.

Back to top button