नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ : पालकमंत्री विखे पाटील | पुढारी

नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ : पालकमंत्री विखे पाटील

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्याच्या विभाजनापेक्षा विकासाचे इतर प्रश्न मोठे आहेत. जिल्हा विभाजनाऐवजी सर्वागिण विकास हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्याचा मानस राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त करत, जिल्हा विभाजनाचा प्रश्न दुर्लक्षित केला. गौणखनिजाचे नवे धोरण लवकरच लागू केले जाणार असून, हे धोरण सर्वसामान्य जनतेसाठी हितकारक ठरणार आहे. गौणखनिज माफियांना आळा घातला जाणारे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.24) पालकमंत्री विखे यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री विखे बोलत होते. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून दरवर्षी अब्जावधीची विकासकामे होत आहेत. या व्यतीरिक्त धार्मिक, नैसर्गिक संपत्तीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आमदार, खासदारांच्या सूचनांची दखल घेतली जाणार आहे. त्यांच्या संमतीने जिल्हा नियोजनमधून काही निधी देखील उपलब्ध केला जाणार आहे.

सुरत- चेन्नई, समृध्दी महामार्ग, औरंगाबाद- पुणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे आदी राष्ट्रीय महामार्गामुळे जिल्हा केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे धार्मिक, नैसर्गिक पर्यटन वाढण्यास, तसेच औद्योगिक विकास होण्यास वाव आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, सिध्दटेक, पाथर्डी येथील मोहटादेवी, राशीनची देवी, मढी आदी धार्मिक तीर्थस्थळे आहेत. या ठिकाणी पर्यटन विकसित करता येईल.

त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास स्थानिक रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचा येणार्‍या भाविकांसाठी फायदाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रतनगड, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, भंडारदरा धरण आदी ठिकाणे निसर्गाने नटली आहेत. या ठिकाणे साहसी पर्यटन विकासासाठी तयार करता येतील. समृध्दी मार्ग सुरू झाल्यास मुंबई, नागपूरकरांना पर्यटनासाठी फायदेशीर ठरणार आहे.

औद्योगिक वसाहतींचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा पूर्ण क्षमतेने वापर करणार आहे. या ठिकाणी ‘आयटी पार्क’ उभे राहावेत, यासाठी प्रयत्न सुरू असून, राज्याच्या ‘आयटी’ कक्षाची मदत घेतली जाणार आहे. या व्यावसायिक पार्कमुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे गौणखनिजाच्या नवीन धोरणाबाबत सविस्तर सांगता येणार नाही. मात्र, सर्वसामान्य जनतेसाठी ते हितकारक असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या हितासाठी ट्रान्सफॉर्मर बँक
रोहित्र बिघाडामुळे शेतकर्‍यांना वारंवार समस्सेला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बँकेची स्थापना केली जाणार आहे. यातून तत्काळ ट्रान्सफॉर्मर बदलून देण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध केला जाणार आहे. तसेच, महावितरण कंपनीकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे.

नगर ‘एमआयडीसी’बाबत व्यक्त केली खंत
नगर ‘एमआयडीसी’चा विकास ज्या गतीने हवा होता, तो मात्र झालेला नाही, अशी खंत पालकमंत्री विखे यांनी व्यक्त केली. श्रीरामपूरचे काही उद्योगधंदे बंद पडले आहेत. काही ठिकाणी उद्योगधंदे बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी नाशिक येथील ‘एमआयडीसी’ प्रादेशिक अधिकारी कार्यालय नगर येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महसूलमंत्री विखे यांनी सांगितले.

 

Back to top button