लोणी : प्रवरानगर येथे दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न | पुढारी

लोणी : प्रवरानगर येथे दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न

लोणी; पुढारी वृत्तसेवा : राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे अयशस्वी दरोड्याचा प्रयत्न झाला. दरोडा टाकणार्‍या दोघांना पकडण्यात यश आले. मात्र अंधाराचा फायदा घेत चौघा जणांनी पळ काढला. येथील रहिवासी असलेले शास्त्रज्ञ डॉ. योगेश एकनाथराव खरात यांना घराचे कुलूप तोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बघितले असता, चार दरोडेखोर घराबाहेर उभे दिसले. थोरात यांनी प्रवरा कारखान्याचे गेटवर फोन करून मदत मागितली. लोणी पोलिस ठाण्याला फोन करायला सांगितले. त्यावेळेस 2 आरोपी हे घर फोडत होते. काही वेळातच दोघांनी घर फोडून आत मध्ये प्रवेश केला. डॉ. योगेश थोरात व त्यांच्या पत्नीला दरोडेखोरांनी धमकावले.

‘चुपचाप बैठो, नही तो मार देंगे’ असे म्हणून टेबलवर ठेवलेली माझ्या पत्नीची पैशाची पर्स त्यांनी घेतली. त्याचवेळी तेथे लोणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील व पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांना बघून घराबाहेरील चार दरोडेखोर हे अंधाराचा फायदा घेऊन उसात पळाले. तसेच त्यांनी घरात असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांना वेगळा इशारा केला. घरात असलेले दोन दरोडेखोर पळायला लागले. त्याचवेळी लेबर कॉन्ट्रॅक्टर संतोष जायभाये यांनी दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न करत केला. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या हातावर लोखंडी पान्हा मारून त्यांना जखमी केले. मात्र लोणी पोलिसांनी पळणार्‍या दोन दरोडेखोरांना अतिशय शिताफतीने पकडले.

यामध्ये आरोपी अमरसिंग नाथसिंग मीनावा (वय 25, राहणार गुराडिया जिल्हा, धार, मध्यप्रदेश) तसेच रितूसिंग लालसिंग मीनावा (वय 50, रा. गोराडिया, जिल्हा धार, मध्यप्रदेश) या दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून कटर, लोखंडी पान्हा, टॉवेल मध्ये गुंडाळलेला दगड इत्यादी दरोड्याचे सामान आरोपीकडे सापडले. वरील दोन आरोपीवर लोणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाकीच्या चार दरोडेखोरांचा लोणी पोलिस शोध घेत आहे. वरील दरोडेखोर पकडण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील ,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे तसेच पोलिस नाईक आप्पासाहेब तमनर, पोहेकॉ. शिवाजी नरे,
पोहेकॉ. सूर्यभान पवार, पोलिस नाईक संभाजी कुसळकर यांनी परिश्रम घेतले.

Back to top button