राहाता : अस्तगाव-बेलापूर रस्त्याचे रूपडे पालटणार ! | पुढारी

राहाता : अस्तगाव-बेलापूर रस्त्याचे रूपडे पालटणार !

राहाता : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अस्तगाव, खंडाळा, नांदूर, बेलापूर या महत्त्वपूर्ण मार्गासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय मार्ग निधीतून 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता व श्रीरामपूर या दोन तालुक्यांना जोडणार्‍या या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधी योजनेतून निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग अतिशय महत्त्वपूर्ण असून, अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. उपलब्ध होणार्‍या निधीतून आता या मार्गाच्या रुंदीकरणासह नूतणीकरण करण्यात येणार असल्याने या मार्गाचा मोठा फायदा शेतकरी, स्थानिक नागरिक आणि साईभक्तांना होईल.  या मार्गावर अस्तगाव, मोरवाडी, चोळकेवाडी, वाकडी, नांदूर ही महत्त्वपूर्ण गावे येत असल्याने श्रीरामपूरसह राहाता तालुक्यातील दळणवळण या मार्गावरून मोठ्या प्रमाणात सुरू असते.

नव्या होणार्‍या मार्गामुळे श्रीरामपूर येथील व्यापारी व शिर्डी येथे येणार्‍या भक्तांना विमानतळाचे अंतरही जवळ पडणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती उत्पादन घेतात. प्रामुख्याने डाळिंब, पेरू व फुलशेतीची बाजारपेठ मोठी असल्यामुळे या मार्गाचा शेतकर्‍यांनाही मोठा लाभ होईल, असा विश्वास मंत्री विखे पा. यांनी व्यक्त केला. रस्ता मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

केंद्राकडून रस्ते विकास धोरण निश्चित : विखे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाचे धोरण निश्चित केले आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पुढाकार घेऊन या रस्ते विकासाला नवी दिशा दिली आहे. या पार्श्वभूमिवरच राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांना जोडणार्‍या या मार्गासाठी उपलब्ध झालेला निधी महत्त्वपूर्ण असल्याचे विखे पा. यांनी सांगितले.

Back to top button