नगर : यंदा महागणार गरिबांची ‘भाकरी’ ; अतिवृष्टी अन् वातावरण बदलाने उत्पादन घटले | पुढारी

नगर : यंदा महागणार गरिबांची ‘भाकरी’ ; अतिवृष्टी अन् वातावरण बदलाने उत्पादन घटले

ज्ञानदेव गोरे : 

वाळकी : नगर तालुक्यात यंदा अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी अन्न धान्यांचे उत्पादन कमीच पडले. तर, काही ठिकाणी हाती आलेले पिक मातीमोल झाले. नोहेंबरच्या मध्यापर्यंत होत असलेल्या पावसामुळे रब्बीतील ज्वारीचा पेर लांबणीवर पडल्याने तालुक्यात ज्वारी ऐवजी बळीराजा अन्य पिकांकडे वळला. परिणामी यंदा ज्वारी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने बाजारात अन्न धान्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली. यामुळे गरीबांची ‘भाकरी’ यंदा महागणार, असेच चित्र आहे.  नगर तालुका तसा जिरायती पट्टा, शेती सिंचनाच्या कोणत्याही योजना नसल्याने पावसाच्या भरवशावर शेती पिकांचे दरवर्षी नियोजन करावे लागते. सुरुवातीला पाऊस झाला तरच खरीप पिकांचे उत्पादन बळीराजाच्या पदरी पडते.

अन्यथा रब्बी पिकांच्या आशेवर राहावे लागते. मात्र, तीन वर्षांपासून तालुक्यात दमदार सरासरीने पाऊस होत असल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली. मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी होत असल्याने खरीपातील पिकांना मोठा फटका बसत आहेत. विशेष म्हणाजे, या अतिवृष्टीचा दरवर्षी बाजरी पिकाला फटका बसतो. सातत्याने अतिवृष्टीचा फटका बसत असल्याने पेर कमीच झाली होती. त्यात आलेल्या पिकांची पावसाने वाट लावल्याने, बाजरी पिकांचे अत्यल्प उत्पादन हाती पडले.

ज्वारी उत्पादनात अग्रेसर असणार्‍या नगर तालुक्यात, मात्र सातत्याने ज्वारी पिकांच्या क्षेत्रात घट होत गेली. ज्वारी पिकांऐवजी शेतकरी अन्य पिकांकडे वळल्याचे दिसते. यंदा नोहेंबरच्या मध्यापर्यंत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने ज्वारीच्या पेरण्या लांबणीवर गेल्या. परिणामी यंदा ज्वारीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात कमी झाल्याचे दिसते. तालुक्यात अवघी 22 हजार हेक्टर क्षेत्रांवर ज्वारीची पेरणी झाली.
कृषी विभागाने 28 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज बांधला होता. मात्र, प्रत्येक्षात शेतकर्‍यांनी ज्वारी पिकांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. म्हणजेच, यंदा ज्वारीच्या पेरणीतच घट झाली. त्यातच सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने आहे त्या पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव होत आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीत अवकाळी पावसाचा फटका बसला तर ज्वारीच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे.

 

ज्वारीच्या क्षेत्रात दरवर्षी घट होत असल्याने उत्पादन कमी-कमी होत गेले. दोन वर्षांपासून बाजारात अडीच हजार प्रति क्विंटल ज्वारीचे दर सध्या 4 ते 5 हजारांपर्यत पोहोचले. ज्वारीच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने भाकरी सर्वसान्यांच्या आवाक्याबाहेर गेली.
                                                                   – रामचंद्र साठे, वाळकी

ज्वारीसाठी होणरा उत्पादन खर्च मोठा आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती, सातत्याने वातावरणातील बदलाने उत्पादन घटत आहे. त्यातच ज्वारी काढणीसाठी मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण होतो. जनावरांच्या चार्‍यासाठी ज्वारीची मोठी पेर होत होती. मात्र, चार्‍यासाठी दूध उत्पादक शेतकरी अन्य चारा पिकांना प्राधान्य देत असल्याने दरवर्षी ज्वारीच्या क्षेत्रात घट होत आहे.
                                                             – कुंडलिक कांडेकर, शेतकरी, वाळकी

Back to top button