नगर : गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे | पुढारी

नगर : गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदारांकडून कायद्याचा अनादर होत आहे. 25 वर्षे सहभागृहात राहून कायदे बनविण्याचे काम त्यांनी केले. एका ऑडिओ क्लिपमधून ते त्यांच्या पक्षाच्या दिवंगत खासदारांच्या पुत्राला हात-पाय तोडण्याची भाषा बोलतात. याप्रकरणाची सखोल चौकशी करून सहा दिवसांत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला. माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी गुरूवारी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, माजी जिल्हा परिषद बाळासाहेब हराळ, प्रताप पाटील शेळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, नगरसेवक योगीराज गाडे आदी उपस्थित होते. ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, माजी आमदारांच्या ऑडिओ क्लिपसंदर्भात पत्रकारांशी बोलताना माजीमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, अनेक वर्षे आमदार असलेले व कायदेमंडळात काम केले अशा सध्याच्या राज्यातील सत्ताधारी भाजपचे माजी आमदार असलेल्या व्यक्तीने कायद्याचा अनादर केला आहे. कायद्याला न जुमता दोन चार केस झाल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशी भाषा माजी आमदार बोलू शकतात, त्याचा समाजमनावर मोठा परिणाम होऊ शकतो. माजी आमदारांकडून भाजपातील माजी खासदार पुत्राला फोनवर धमकी देत हात-पाय तोडण्याची अरेरावीची भाषा करीत आहेत. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी पूर्ण राज्यात अशीच भाषा करीत आहेत. त्यामुळे हे कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुर्‍हाणनगरचे अ‍ॅड. अभिषेक भगत यांच्यावरही माजी आमदाराने अन्याय केला आहे. बुर्‍हाणनगरच्या मंदिराचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अद्याप कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसताना माजी आमदाराने त्यांच्या घरावर शंभर माणसे पाठवून तेथे दमदाटी व शिवीगाळ केली आहे. त्यामुळे राज्यात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही हे सिद्ध होते. सत्तेत आल्यावर कायद्याला जुमानायचे नाही, अशीच परिस्थिती पूर्ण राज्यात असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करीत आहे.

सभागृहात लक्षवेधी मांडणार

माजी आमदारांच्या ऑडिओ क्लिपसंदर्भात पोलिसांनी कारवाई न केल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात त्यांवर लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली. अशा पद्धतीने धमकी देणे हे लोकशाहीत बसत नाही. लोकप्रतिनिधींनी लोकशाहीच्या मार्गाने गेले पाहिजे. कोणी कोणत्या पक्षात काम करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विरोधात काम केल्यानंतर त्याला धमकावणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कायदा मोडणार्‍यावर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

Back to top button