संगमनेर : घुलेवाडीत आ. थोरात यांचे दोन गट आमने-सामने | पुढारी

संगमनेर : घुलेवाडीत आ. थोरात यांचे दोन गट आमने-सामने

गोरक्ष नेहे :

संगमनेर : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या घुलेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मानणारे दोन गट आमने-सामने निवडणूक लढवत आहेत. मागील वेळी अविश्वास ठरावाच्या निवडणुकीत अगदी कमी मताने पराभव झालेल्या माजी सरपंचांनीच सत्ताधार्‍यांना शह देण्यासाठी स्वतंत्र पॅनेल उभा करून ‘काट्याची टक्कर’ देणार आहे. त्यामुळे या अटीतटीच्या होणार्‍या निवडणुकीत गावचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा? हे मतदार राजा ठरविणार आहे.

संगमनेर शहरालगत अन् विस्ताराने सर्वात मोठ्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये मागील पंचवार्षिकच्या वेळी जनतेतून सरपंच पद निवडले गेले होते. त्यावेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दारून पराभव करत जनतेमधून सोपान राऊत हे निवडून आले होते. मात्र सर्वाधिक सदस्य हे आ. थोरात गटाचे निवडून आले होते. मात्र सरपंच एकमेव विरोधी गटाचा असल्यामुळे खेळी करत जनतेतून निवडून आलेल्या सोपान राऊत यांच्यावर जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य सीताराम राऊत यांच्या गटाने अविश्वास ठराव आणला होता. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. त्या मतदानात अवघ्या काही मतांनी राऊत यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

सत्ताधारी काँग्रेसने आपल्याला सरपंच पदावरून पायउतार केल्याची सल राऊत त्यांच्या मनात कायम होती. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे पाठबळ अगर झेंडा हातात न घेता स्वतःच्या हिमतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनेल तयार करून सरपंच पदासह सर्वच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस कडून माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या ‘शेतकरी विकास’ मंडळाचे नेतृत्व माजी जि. प. सदस्य सीताराम राऊत हे करत असून त्यांनीही स्वतंत्र पॅनेल तयार केला आहे. तर माजी सरपंच स्व. अजित पानसरे यांच्या पत्नीने दंड थोपटत त्या स्वतः सरपंच पदाची निवडणूक लढवीत आहेत.

पण त्यांनी स्वतः स्वतंत्र सर्व सदस्यांचा ‘शेतकरी परिवर्तन पॅनेल’ तयार करून ‘शेतकरी विकास’ मंडळाच्या उमेदवारांनाच शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार थोरात यांच्या दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करून चुरस निर्माण केली आहे. या निवडणुकीत ‘शेतकरी विकास’ मंडळाकडून स्वाती सतीश राऊत यांच्या विरोधात ‘शेतकरी परिवर्तन’ पॅनेलकडून माजी सरपंच स्व. अजित पानसरे यांच्या पत्नी श्रीमती शीतल अजित पानसरे या निवडणूक लढवित आहे. तर विरोधी गटाकडून माजी सरपंच सोपान राऊत यांचे नेतृत्व मान्य करणार्‍या निर्मला उर्फ शीतल कैलास राऊत या ‘ग्रामविकास परिवर्तन’ पॅनेलच्या वतीने तर छत्रपती संभाजी राजे यांचे नेतृत्व मान्य करणार्‍या ‘स्वराज्य’ पक्षाकडून भाग्यश्री संदीप राऊत या चार महिलांच्या मध्येच खर्‍या अर्थाने चौरंगी लढत होत आहे. या लढतीत कोण बाजी मारेल? याकडे संपूर्ण गावासह तालुक्याचे लक्ष लागून आहे.

घुलेवाडी ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. आता मतदानासाठी अवघे चारच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे जनतेतून निवडणूक लढविणारे सरपंच पदाचे तसेच सदस्य पदाचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटींवरती भर देत आम्हीच गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो, असे मतदारांना ठामपणे सांगण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगत चांगलीच वाढली आहे.

विरोधक खाणार काँग्रेसची मते

घुलेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ‘शेतकरी विकास’ मंडळ आणि ‘परिवर्तन विकास’ मंडळ या दोन्ही पॅनेलच्या बॅनर वरती काँग्रेसचे आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्यासह इतर सर्वच नेत्यांचे फोटो एकमेकांच्या समोरासमोर झळकत आहेत. हा त्यांचा विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न असला तरी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या या पॅनेलचे उमेदवार निश्चितच काँग्रेसचेच मते खाणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे.

Back to top button