…तर शिवसेना राज्यस्तरावर आंदोलन करणार : दानवे | पुढारी

...तर शिवसेना राज्यस्तरावर आंदोलन करणार : दानवे

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  शेतीपंपाचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याने शेतातील पीक पाण्याअभावी जळू लागल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केलेल्या नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांच्या कुटुंबीयाची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (दि.1) दुपारी भेट देऊन सांत्वन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते दानवे यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडू. त्यासाठी राज्यस्तरावर आवाज उठवू, अशी ग्वाही दिली.

सरकारने या कुटुंबास मदत देण्यास नकार दिला, तर शिवसेना त्या विरोधात राज्यभर आंदोलन करेल, असेही ते म्हणाले. याशिवाय शिवसेनेकडूनही भरीव मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना तेथे बोलावून घेत चांगलेच धारेवर धरले. अकोळनेर परिसरातील अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते, त्यांनी विरोधी पक्षनेते दानवे यांच्यापुढे महावितरण कंपनीच्या तक्रारींचा पाढा वाचला. शेतकर्‍यांच्या या प्रश्नांवर सरकारदरबारी आवाज उठवू, असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, शिवसेनेचे नगर शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अकोळनेरचे सरपंच प्रतिक शेळके यांच्यासह गावातील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Back to top button