श्रीरामपुरात गतिरोधक आरोग्यास बाधक ! | पुढारी

श्रीरामपुरात गतिरोधक आरोग्यास बाधक !

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेले गतिरोधक (स्पीड ब्रेकर) सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास त्रासदायक ठरले आहेत. प्रत्येक रस्त्यावर भरमसाठ गतिरोधक निर्माण केल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. यातून शहरात तब्बल 70 टक्के वाहन चालकांना पाठिचे आजार जडले आहेत. दरम्यान, याप्रश्नी शहरातील काही डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी शहरात काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले. ते कशा गुणवत्तेचे झाले, हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. संगमनेर- नेवासा रस्ता वर्षांपूर्वी झाला. अडीच कोटी रुपये खर्चून डांबरीकरण केलेल्या या रस्त्याची अवघ्या वर्षात चाळण झाली. आतीा या रस्त्यावरून गाड्या चालविणे मोठे दिव्य ठरत आहे.

रस्ते डांबरीकरण झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला. तो रोखण्यास गतिरोधक बनविले. त्यास कोणाचा विरोध नाही, मात्र गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने बनविल्याने त्याचा मोठा त्रास दुचाकी व चार चाकी वाहन धारकांना होत आहे. गतिरोधकांना नको तेवढी उंची दिल्याने वाहन स्लो केले तरी ते आदळते. यातून पाठिच्या मणक्यांचा त्रास वाढला आहे. मणक्याच्या त्रासाने आजारी पडणारांची संख्या वाढत आहे. यामुळे काही डॉक्टरांचं मात्र भलं झालं. शहरातील काही अस्थिरोग तज्ज्ञांना याबाबत विचारले असता गतिरोधकांमुळे मणक्यांमध्ये गॅप पडणे, मनके सरकणे, पाठित चमक भरणे असे आजार वाढले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे काही डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, बेलापूर रोड, कॅनॉल रोड, गोंदवणी रोड या भागात मुख्य रस्त्यांसह उपनगरात रस्त्यांवर भरमसाठ गतिरोधक आहेत. 1 किलो मीटरच्या रस्त्यावर तब्बल 20 गतिरोधक बांधण्याचा विक्रम पालिकेच्या बांधकाम विभागाने केला. यामुळे वाहनांची गती रोखण्यास चुकीच्या पद्धतीने बांधलेले काही गतिरोधक काढून शास्त्रीय पद्धतीचे कमीत- कमी गतिरोधक असावेत, अशी मागणी शहरातील जागरुा नागरिकांनी केली आहे. पालिका यप्रश्नी लक्ष घालणार का, असा सवाल आहे.

खड्डे अद्यापि जैसे थे !

नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी शहरात कुठेही फिरताना दिसत नाही. मुख्य अभियंता कार्यालयात सतत काही ठेकेदारांच्या घोळक्यात दिसतात. रोजंदारीवरील काही अभियंता कार्यालयात सकाळी आले की, दिवसभर गायब होतात. शहरामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एका संघटनेच्या इशार्‍यानंतर मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजविले, मात्र गल्ली-बोळातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्याप जैसे-थेच आहेत.

Back to top button