वाळकी : निवडणूक गावकीची, प्रतिष्ठा पणाला लागणार नेत्यांची ! | पुढारी

वाळकी : निवडणूक गावकीची, प्रतिष्ठा पणाला लागणार नेत्यांची !

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. या गावांमध्ये दुसर्‍यांदा सरपंचपदाची निवड जनतेतून होणार असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. गावावर घट्ट पकड मिळविण्यासाठी सत्ताधारी-विरोधी गटाकडून मतदारांना आमिष दाखविला जात आहेत. निवडणूक गावची असली तरी तालुक्याच्या राजकारणात दबदबा कायम राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्यास आजपासूवन (दि . 28) पासून प्रारंभ होत आहे. मात्र, त्या आधीच गावातील वातावरणात राजकीय रंग भरण्यास प्रारंभ झाला आहे. सरपंच पदावरून सत्ताधारी व विरोधी गटांमध्ये राजकीय संघर्ष होणार असून, दोन्ही गटांकडून मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी खर्चासाठी हात मोकळे सोडण्याचे धोरण हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील नेत्यांना सरपंच पदावर आपला कट्टर व निष्ठावंत समर्थक निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये राजकीय सामना रंगणार आहे. काही ठिकाणी भाजपमधील दोन गट एकमेकांविरोधात झुंजणार असल्याचे चित्र आहे.

सोनेवाडी (चास) मध्ये खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे गटाच्या विरोधात गोरख दळवी गट दंड थोपटणार आहे. सारोळा कासारमध्ये पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस गटाविरोधात संजय काळे, गोरख काळे, जयप्रकाश पाटील, संजय धामणे यांच्या गटात पारंपरिक लढत रंगणार आहे. आठवडमध्ये सरपंच राजेंद्र मोरे व बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांच्या गटाविरोधात माजी सरपंच सुनील लगड, भाऊसाहेब लगड यांच्या गटात लढतीची शक्यता आहे.

कापूरवाडीमध्ये कर्डिले गट व शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांच्या गटांत लढाई रंगणार आहे. नेप्तीमध्ये अरुण होळकर, संजय जपकर यांच्यात वर्चस्वासाठी सामना होणार आहे. राळेगणमध्ये सरपंच सुधीर भापकर यांना विरोधी आघाडीशी लढत द्यावी लागणार आहे. वडगाव तांदळीमध्ये कर्डिले गटाविरोधात आ . पाचपुते गट व महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. येथे सत्तेसाठी ठोंबरे, रणसिंग, पिंपळे गटामध्ये राजकीय सामना रंगणार आहे.

या गावांना मिळणार पुन्हा थेट जनतेतून सरपंच वाळकी, सारोळा कासार, राळेगण म्हसोबा, नारायणडोहो, वडगाव तांदळी, आठवड, खातगाव टाकळी, पिंपळगाव लांडगा, रांजणी, बाबुर्डी बेंद, पिंपळगाव कौडा, दहिगाव, कापूरवाडी, सोनेवाडी (पिलां), शेंडी , टाकळी खातगाव, आगडगाव, सोनेवाडी (चास), मदडगाव, पांगरमल, उक्कडगाव, जखणगाव, कौडगाव (जांब), नांदगाव, नेप्ती, साकत खुर्द, सारोळा बद्धी.

वाळकीची निवडणूक होणार लक्षवेधी

वाळकी ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षीवेधी ठरणार आहे. मागील दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीवर ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे यांचे वर्चस्व आहे. बोठे यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी माजी उपसभापती रंगनाथ निमसे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, धर्मराज शैक्षणिक संस्थेचे संस्थापक एन . डी . कासार, पंचायत समितीचे माजी सदस्य संभाजी कासार, महादेव कासार, शिवसेनेचे अप्पासाहेब भालसिंग, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुहास कासार यांनी एकत्र येत बोठे यांच्या वर्चस्वाला खालसा करण्याची जोरदार तयारी केली आहे. सरपंचपदासाठी माजी उपसभापती रंगनाथ निमसेंविरुद्ध शरद बोठे यांच्यात सामना रंगणार आहे.

Back to top button