नगर : धूमस्टाईलने महिलांचे मंगळसूत्र लंपास | पुढारी

नगर : धूमस्टाईलने महिलांचे मंगळसूत्र लंपास

नगर : पुढारी वृत्तसेवा :  भिंगार परिसरातून महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेल्याच्या दोन घटना गुरुवारी (दि.23) घडल्या. पहिली घटना भिंगारमधील सरपण गल्ली समोरील गुगळे इलेक्ट्रीकच्या दुकानासमोर घडली. रस्त्याने महिलेच्या गळ्यातील 22 हजार 500 रूपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने बळजबरीने ओरबडून नेले. याबाबत संगिता गणेश बारटक्के (रा.रंगार गल्ली, भिंगार) यांनी भिंगार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संगिता या त्यांची सून व जाऊ यांच्यासमवेत रस्त्याने जात असताना चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र ओरबडून नेले. तर, दुसरी घटना आर्मी हद्दीतील गुरूद्वारासमोर घडली आहे. मोपेडवरुन मुलाला शाळेत आणण्यासाठी जात असलेल्या महिलेल्या गळ्यातील पंधरा हजार किमतीची सोन्याची चैन चोरट्याने ओरबडून नेली. याबाबत पलक विक्रम चुग (रा.पंजाबी हॉलच्या पाठीमागे) यांनी भिंगार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भिंगार परिसरात चोर्‍या वाढल्या

शहरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेण्याचे प्रकार गत काही दिवसांपासून सतत घडत आहेत. मात्र, चोरटे अद्यापही पोलिसांना गुंगारा देऊन मोकाट असल्याचे चित्र आहे. भिंगार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंगचे प्रकार सतत सुरू असताना पोलिस अधिकारी चोरट्यांना पायबंद घालण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button