‘मुड्या’ने दिले पाच हजार सापांना जीवदान, सर्पमित्र फिरोज आतारला पाथर्डीसह जवळच्या तालुक्यातील लोकांकडून बोलावणे | पुढारी

‘मुड्या’ने दिले पाच हजार सापांना जीवदान, सर्पमित्र फिरोज आतारला पाथर्डीसह जवळच्या तालुक्यातील लोकांकडून बोलावणे

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: पाच हजार सापांना पकडून सर्पमित्र फिरोज आतार उर्फ मुड्या यांनी जीवनदान दिले आहे. 17 वर्षांपासून मुड्या अत्यंत सेवाभावी पद्धतीने काम करताना त्यांनी विविध जातीचे विषारी, बिनविषारी मिळून पाच हजार सापांना जीवदान देत निसर्गात मुक्त केले. एखाद्या घरात, शेतात, विहिरीत अथवा दुकानात साप निघाला की, फिरोज आतार या सर्पमित्राला तालुक्यासह पाथर्डी तालुक्यात जवळच्या तालुक्यातील लोक साप पकडण्यासाठी बोलवतात. पाच हजारव्या सापाला मुक्त करताना त्यांनी त्याचे पूजन केले.

शहरातील मौलाना आझाद चौकात राहणार्‍या हातावर पोट भरणार्‍या मुस्लिम कुटुंबातील फिरोज आतार यांनी साप पकडण्याचे तंत्र त्यांचे बंधू गफार आतार यांच्याकडून आत्मसात केले. साप, नाग, अजगर, मन्यार, घोणस यासह गवती साप पकडून त्यांना निसर्गात मुक्त करताना आतार यांना इतर वन्य जीवांचा सुद्धा लळा लागला. जंगली पक्षांनाही काही धोका उद्भवल्यास त्यांना सुरक्षित पकडून निसर्गात मुक्त केले.

विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद अशा मोठ्या निवडणुकीच्या वेळी फिरोज आतार व त्यांची मित्र मंडळी निवडणुकीच्या कालावधीत ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज चालते त्याजागी सर्पमित्र 24 तास कार्यरत असतात. प्रांत अधिकारी देवदत्त केकाण यांनीही सर्पमित्र टीमचे सहकार्याबद्दल आभार मानले. मोटरसायकलच्या पेट्रोलसाठीचा खर्च घेऊन त्यांनी खर्‍या अर्थाने अशी सेवा जीवावर उदार होऊन चालू ठेवली आहे. आजपर्यंत पाच हजार साप पकडण्याचा विक्रम नुकताच केला.

भीतीमुळे लोकांकडून सर्पाची हत्या केली जाते. अनेक प्रजाती विषारी नाहीत सापांना मारू नका. मोठ्या संख्येने हत्या होत असल्याने पूर्वी सर्रास आढळणारे गवती व कवड्या साप आता खूप कमी आढळतात. घुबड, घोरपड, गरुड पक्षी जखमी अवस्थेत पकडून त्यांनाही तज्ज्ञांकडून उपचार करून निसर्गात मुक्त केले. ससे, हरीण व अन्य वन्यजीवही संकटात दिसले, तर त्यांनाही जीवदान दिले. अशी सेवा करताना वेगळेच समाधान मिळते. ईश्वराने माणसाचे जीवन भयमुक्त करण्यासाठी सेवा करण्याची कला दिली त्याचा उपयोग आपण अखेरपर्यंत करू. रात्री, आप रात्री कुठूनही निरोप मिळाला की, सहकार्‍याला घेऊन आपण त्या ठिकाणी जातो, असे आतार म्हणाले.

‘पकडण्यासाठी मंत्र वगैरे काही नाही’

सर्पमित्र आतार म्हणाले, एकाग्र मन, जबरदस्त आत्मविश्वास व सापाच्या वर्तनाचा अभ्यास केल्यास कोणीही साप पकडू शकतो. यासाठी मंत्र वगैरे काही नाही. समाज माध्यम, पुस्तके व अभ्यासकांकडून सापांच्या प्रजाती व त्यांच्या मानसिकतेची माहिती घेतली. गेल्या आठवड्यात विहिरीत पडलेले सुमारे साडेपाच फुटाचे जखमी अजगर पकडून त्यावर तज्ज्ञांकडून उपचार करून त्याला मढी रस्त्यावरील जंगल परिसरात सोडून दिले. विहिरीत उतरण्यासाठी पट्टा, मोठे दोर, वेगळ्या प्रकारचे बूट, मोठ्या पिशव्या व ओळखपत्र वन विभागाकडून मिळाल्यास या कामातील धोके टळून अधिक चांगली सेवा देता येईल

Back to top button