स्कूल बसची टेम्पोला जोरदार धडक ; तांदळी परिसरात अपघात | पुढारी

स्कूल बसची टेम्पोला जोरदार धडक ; तांदळी परिसरात अपघात

काष्टी :  पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथून शिरूर तालुक्यातील तांदळी शिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलांच्या टाटा एस टेम्पोला स्कूलबसने जोराची धडक दिल्याने 12 महिलासह चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) दुपारी 4 च्या सुमारास घडली. जखमींना काष्टी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काष्टी (गजाननवाडी) येथील बारा महिला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कापूस वेचण्यासाठी दररोज शिरुर तालुक्यातील तांदळी परिसरात जातात. शुक्रवार (दि. 4) काम संपल्यानंतर त्या काष्टी येथे टाटा एस टेम्पोने (एम.एच. 12 जी. टी 6455) माघारी येत होत्या.

यावेळी तांदळी परिसरात काष्टीकडून मांडवगण फराट्याकडे भरधाव वेगाने जाणार्‍या स्कूल बसने (एम.एच. 42 ए.एफ. 4025) टेम्पोला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात टेम्पोचालक सचिन शहाजी विघ्ने (वय 19) याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तर, रतन चंद्रकांत रासकर (वय 43), सविता दत्तात्रय शिंदे( वय 35), अरुणा माधव कोकाटे (वय 65), ज्योती कैलास सकट वय (30), अनिता दादा पोकळे (वय 37), आशा संतोष कोकाटे (वय 33), वर्षा मारुती लोखंडे (वय 39), स्वाती अनिल चौरे (वय 33), छाया कल्याण राऊत (वय 42), प्रिया बुधाराम चौधरी (वय 33), अनिता पांडुरंग दातीर वय 40) तसेच अर्चना मच्छिंद्र माने (वय 35) या बारा महिला जखमी झाल्या आहेत. यामध्ये दोघींची प्रकृती गंभीर आहे.

अपघातानंतर स्कूल बसचा चालक फरार झाला. जखमी महिलांना शिरूर पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांनी आपल्या वाहनातून काष्टी येथे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव पाचपुते यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींना धीर देत त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. कुटुंबातील महिलांना अपघात झाल्याचे समजताच हॉस्पिटलजवळ मोठी गर्दी झाली तेव्हा जखमी महिलांनी घरातील सदस्यांच्या गळ्यात पडून मोठा आक्रोश करित टाहो फोडला होता. परंतु दैव बलवंत असल्याने जीवित हानी झाली नल्याने मोठा अनर्थ टळला हीच चर्चा होती.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात
टेम्पोला धडक देणारी ही बस केडगाव (ता.दौंड) येथील जवाहरलाल इंग्लिश मेडियम स्कूलची आहे. श्रीगोंदा तालुक्यात एक लग्नाचे वर्‍हाड घेऊन ही बस आली होती. वर्‍हाड घेऊन ही बस माघारी जात असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये आहे.

Back to top button