घाटघरला सुमारे आठ इंच पाऊस.. नदीकाठी सर्तकतेचा इशारा | पुढारी

घाटघरला सुमारे आठ इंच पाऊस.. नदीकाठी सर्तकतेचा इशारा

अकोले : पुढारी वृत्तसेवा : भंडारदरा पाणलोटात क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणातून 10 हजार 992 तर निळवंडे धरणातून 18 हजार 904 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन- चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने घाटावर उर्ध्व धरण, भंडारदरा, निळवंडे, कृष्णावंती धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. मंगळवार पासून पावसाला सुरुवात झाली आहे.

तर बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढत असल्याने साम्रद, रतनवाडी, घाटघर, उडदावणे, पांजरे, कोलटेंभे, बारी,शेणीत या आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे जनावरानसह नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. आदिवासी बांधवांच्या शेकोट्या पुन्हा एकदा पेटल्याचे दिसुन येत आहे. पशुधन वाचविण्यासाठी आदिवासी शेतकरी बांधवांनी जनावरे घरातच बांधणे पसंत केले. मुसळधार पाऊस पडत असल्याने भात शेतीला मोठा फटका बसतो की काय? या विवेचनेत शेतकरी आहेत.

भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात असल्यामुळे निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. शुक्रवारी सांयकाळी निळवंडे धरणातून 18 हजार 904 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात झेपावत आहे. परिणामी प्रवरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे नदीकाठावर असणार्‍या नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी शंशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.
गेल्या चोवीस तासात भंडारदरा येथे 155 मि. मी. पावसाची नोंद झाली असुन घाटघर 196 मि. मी. , रतनवाडी 164 मि. मी., पांजरे 164 मि.मी, वाकी 119 मी मी पावसाची नोंद झाली . वाकी धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असल्याने कृष्णावंती नदी 789 क्युसेसने वाहती आहे.

Back to top button