राहुरी: ऊस शेतकर्‍यांचे संकट दूर होईल : नितीन गडकरी | पुढारी

राहुरी: ऊस शेतकर्‍यांचे संकट दूर होईल : नितीन गडकरी

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: भारतीय शेतीत विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात करून शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी केल्यास शेतकर्‍यांची प्रगती व विकास होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. म. फुले कृषी विद्यापीठ व अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतीसाठी ड्रोनचे महत्व’ या एकदिवसीय परिषदेत ना. नितीन गडकरी बोलत होते. जागतिक बँक अर्थ सहाय्यित, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत म. फुले कृषी विद्यापीठात ‘शेतीस ड्रोनचे महत्व’ ही परिषद पार पडली.

या परिषदेस राज्यातून 300 हून अधिक शेतकरी, ड्रोन विक्रेते व निर्माते, कृषी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कुलगुरु डॉ. इंद्रमणी मिस्त्रा, डॉ. सी. डी. मायी, भारत सरकार कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय संयुक्त सचिव सौमिता बिस्वास, कास्ट प्रकल्प प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, जितेंद्र गौर, भारतीय कृषी अनुसंधान शास्त्रज्ञ डॉ. साहु, आदिवासी अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, रवी बोरटकर उपस्थित होते. ना. गडकरी म्हणाले, ड्रोन वापरामुळे कृषी क्षेत्रात रोजगार  निर्मिती होईल. ड्रोनद्वारे फवारणी प्रशिक्षण व्यवस्था झाली आहे. यावेळी कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे भाषण झाले.

ऊस शेतकर्‍यांचे संकट दूर होईल..!

ड्रोनने फवारणीमुळे 75 टक्के औषध व खत पिकाला मिळाल्याने शेतकर्‍यांचे उत्पादन वाढण्यास मदत होते, याकडे ना. गडकरी यांनी लक्ष वेधले. जनरेटर व ड्रोन इथेनॉलवर चालावे यासाठी प्रयत्न सुरु आहे. ड्रोनप्रमाणेच हार्वेस्टरची योजना आखली जावी. यात 40 टक्के राज्य शासन व 25 टक्के केंद्र शासनाने अनुदान द्यावे. यामुळे ऊस शेतकर्‍यांसमोरील संकट दूर होईल, असे ना. गडकरी म्हणाले.

Back to top button