पारनेरमधील शेतीचा पाणीप्रश्न सोडवू : आमदार शहाजी पाटील यांची ग्वाही | पुढारी

पारनेरमधील शेतीचा पाणीप्रश्न सोडवू : आमदार शहाजी पाटील यांची ग्वाही

पारनेर; पुढारी वृत्तसेवा: पारनेर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीचा पाणीप्रश्न सारखाच असून, पाणीप्रश्नावर मागणी करणारे नेतृत्व कमी पडल्याने हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबितच आहे. पारनेरच्या शेतीच्या पाणीप्रश्नाचे गार्‍हाणे राज्य सरकारकडे मांडणार असल्याचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. दरम्यान, हे सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांना राजकीय ताकद देणार असून, हा तालुका शिंदे गटाचा बालेकिल्ला करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे काल पारनेर तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता, त्यांनी शिंदे गटाचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्या भाळवणी येथील संपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशाच्या गजरात ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून सत्कार केला. भाळवणीबरोबरच राळेगणसिद्धी फाटा, पारनेर, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या येथेही आमदार पाटील यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, पारनेर आणि सांगोल्याची भौगोलिक व दुष्काळी परिस्थिती समान आहे. दोन्ही मतदारसंघांत मेंढपाळांची संख्या मोठी असून, शेती व पिण्याचा पाणीप्रश्नही सारखाच आहे. आपण सांगोल्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर शिंदे सरकारच्या माध्यमातून 69 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली. या माध्यमातून तेरा गावांचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे सांगत पारनेरच्या पाणीप्रश्नासाठीही आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकार हे उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असून, यात कोणती शंका नसल्याचे सांगत या सरकारच्या काळात राज्य प्रगतिपथावर जाणार आहे. जनतेची खंबीर साथ असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत घवघवीत यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्यात प्रभावी नेतृत्व क्षमता असून, सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे काम चांगले आहे. आगामी काळात रोहोकले यांना राज्य सरकारच्या माध्यमातून व आपण स्वतःही मोठी ताकद निर्माण करून देणार आहोत. त्यांच्याच नेतृत्वाखाली पारनेर तालुका हा बालेकिल्ला करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

शिंदे गटाची ताकद रोहोकले यांच्या पाठीशी
विकास रोहोकले शिंदे गटाचे तालुकाप्रमुख असून, त्यांना शिंदे गटाकडून ताकद देण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगत रोहोकले यांचे शिंदे दरबारी वजन वाढणार आहे. त्याचबरोबर तालुक्यात शिवसेनेचा शिंदे गट रोहोकले यांच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पाटील यांच्या पारनेर दौर्‍यातून स्पष्ट झाले.

Back to top button