बाजारपेठेला आले नवचैतन्य..! | पुढारी

बाजारपेठेला आले नवचैतन्य..!

नगर : पुढारी वृत्तसेवा : चौसष्ट कला अन् चौदा विद्या यांचे दैवत म्हणजे गणपती..लाडक्या बाप्पाचे स्वागत नगरकरांनी बुधवारी मोठ्या जल्लोषात केले. विघ्नहर्त्याच्या आगमनाने यंदा बाजारात नवचैतन्य निर्माण झाले असून, सर्वच व्यवसायांना झळाळी मिळाली आहे. बाप्पा पाठोपाठ आता गौराईंचे आगमन झाले आहे. त्यामुळे बाजारपेठा सजल्याचे चित्र नगरमध्ये आहे. फुले, नारळ, मिठाई, फळे, पूजेचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी नगरकरांकडून होत आहे.

शहरातील चितळे रोड, दिल्लीगेट, माळीवाडा यासह सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक परिसर, भिस्तबाग चौक अशा विविध भागात खरेदीसाठी नगरकरांची गर्दी पहायला मिळत आहे. गणेशोत्सव काळात लागणार्‍या साहित्याची खरेदी गणेशभक्तांकडून केली जात आहे. दरम्यान, गौराईचे आगमन झाल्याने पूजेचे साहित्य, इलेक्ट्रानिक वस्तू यासह फळे, फुले आदींना मोठी मागणी बाजारात आहे. बाजारात खरेदीसाठी असलेल्या उत्साही वातावरणामुळे गेल्या दोन वर्षांतील कोरोनामुळे व्यवसायांना आलेली मरगळ दूर होणार आहे.

फळे महागली
गणपती आणि गौराईसाठी नगरकरांकडून फळांची मोठी खरेदी होत आहे. फळविक्रेत्यांकडून सफरचंद 100 रूपये किलो, मोसंबी 60 ते 100 रूपये किलो, केळी 60 रूपये डझन, सीताफळ 80 ते 100 रूपये किलो, संत्री 80 रूपये किलो, डाळिंब 100 रूपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.

निशिगंधाने भाव खाल्ला !
शहरातील विविध भागात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मोठ्या धुमधडाक्यात झाली. बाप्पाच्या पूजेसाठी आणि हारासाठी दहा दिवस फुलांना मोठी मागणी असते. गौराईच्या आगमनामुळे फुलांना मोठी मागणी आहे. सध्या फुलविक्रेत्यांकडून झेंडूची फुले 40 रूपये किलो पासून 120 रूपये किलो पर्यंत विकली जात आहेत. शेवंती 120 ते 150 रूपये किलो, तुळजापुरी फुले 80 रूपये किलो, गुलाब 4 रूपये प्रति नग, निशीगंधा 300 ते 800 रूपये किलो आणि गजरा फुले 700 रूपये प्रति किलोप्रमाणे बाजारात विक्री होत आहेत.

दिव्यांचे घुमट, एलईडीची आकर्षक रोषणाई
बाप्पाच्या मखराभोवती आकर्षक रोषणाईसाठी दिव्यांना विशेष महत्त्व आहे. तसेच यंदा माळांशिवाय एलईडी दिव्यांचे घुमट, डान्सिंग दिवे, एलईडी फोकस ग्राहकांच्या पंसतीस उतरत आहेत. गौराईच्या सजावटीसाठी साहित्य उपलब्ध आहे. तसेच आर्टिफिशीअल तोरण प्रत्येकी 150 ते 500 रूपये, फुलांच्या माळा 20 रूपये ते 300 रूपये याप्रमाणे विक्रीसाठी बाजारात आहेत.

पूजेच्या साहित्याची मोठी उलाढाल
गणेशोत्सव आणि गौरी गणेशाच्या काळात लागणार्‍या कापूर, कंठी, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई, निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या वस्तूंना मोठी मागणी असते. पुजेच्या साहित्यात अगरबत्तीचे 50 रुपयापासून 1000 हजारापर्यंत भाव आहेत. तर, धूप 350 रुपये किलो, समई 600 पासून 15 हजारपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत

मोदक मोतीचूरचाच
बाप्पाच्या प्रसादाला मोतीचूर मोदकाला मागणी वाढल्याचे मठाई विक्रेत्यांनी सांगितले. मोतीचूर मोदक 240 रूपये किलो, खोबर्‍याचे मोदक 400 रूपये किलो, घरगुती मोदक 360 रूपये किलो, खव्याचे मोदक 440 रूपये किलो, मलाई मोदक 520 रूपये किलो, काजू मोदक 1200 रूपये किलो प्रमाणे विक्री होत असून यंदा मोदक 40 रूपयांनी महागले आहेत. त्यासोबतच मिठाईमध्ये काजूकतली एक हजार रूपये किलो, मँगोबर्फी 460 रूपये किलो, पेढा 400 पासून 800 रूपये किलो पर्यंत उपलब्ध आहे.

गणपती आणि गौरीच्या पार्श्वभूमीवर फळांची विक्री वाढली आहे. ग्राहकांकडून सफरचंद, मोसंबी, केळी, डाळिंब मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्याने विक्रेत्यांमध्ये उत्साह आहे.
                             – राजाभाऊ चौधरी, नेहरू मार्केट, चितळे रोड, नगर

गेल्या वर्षी कोरोनामुळे फुलांना जास्त मागणी नव्हती. यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याने फुल विक्रीला चांगले दिवस आले आहेत.
                                  – सागर दळवी, फुल विक्रेते, चितळे रोड, नगर

Back to top button