नगर : कृषी विद्यापीठात अग्निविरांची अग्निपरीक्षा..! | पुढारी

नगर : कृषी विद्यापीठात अग्निविरांची अग्निपरीक्षा..!

राहुरी, रियाज देशमुख : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या अग्निवीर भरतीसाठी सुमारे पाच हजार तरुण उत्स्फूर्तपणे राहुरीत दाखल झाले आहेत. चार वर्षे का हात नाही,पण देशसेवा करायचीच असा निर्धार घेऊन हजारो तरूणांचा जथ्था विद्यापीठ हद्दीत दाखल होत आहे. देशाच्या हितासाठी प्राणाची बाजी लावण्यास निघालेल्या भावी अग्निवीरांना परिसरातील दुकानदार जेवण, पाणी चढ्या दराने विकत त्यांची आर्थिक लुटमारी करत असल्याचे दुर्देवी वास्तव चित्र प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक दुकानदारांचे फावत असल्याचे दिसून आले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भारतीय सैन्य दलाच्यावतीने अग्निवीर भरतीसाठी पाच जिल्ह्यातील तरूण-तरूणींना पाचारण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, बीड, धुळे जिल्ह्यातून शेकडो मैल प्रवास करीत आलेल्या भावी अग्निवीर तरूणांचे जथ्थे विद्यापीठ हद्दीमध्ये येत आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतलेले तरूण-तरूणी हे विद्यापीठामध्ये दिवसा दाखल होतात.

अॅकॅडमी चालकांचा पुढाकार

जिल्ह्यातील व परिसरातील अ‍ॅकॅडमी चालकांनी राहुरी परिसरातील काही मंगल कार्यालये तरूणांसाठी नियोजित केलेले आहे. संबंधित शहर व परिसरातील बहुतेक मंगल कार्यालयांमध्ये तरूणांच्या मुक्कामाची सोय झालेली आहे. परंतु हजारो तरूण हे विद्यापीठ परिसरामध्ये निवार्‍यासाठी वणवण भटकंती करीत असल्याचे दिसून आले. सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये तरूणांच्या निवार्‍याची सोय आहे. परंतु संबंधित स्थळी वाढत असलेली गर्दी पाहून अनेक विद्यार्थी स्वत: आणलेल्या वाहनात किंवा वाहनाच्या अडोशाला अंग टाकून विश्रांती घेत असल्याचे दिसून आले.

रात्री 12 वाजता तरूणांच्या समुहाला कॅम्प मध्ये प्रवेश दिला जातो. यानंतर रनिंग करण्याचा आदेश मिळताच अग्नीविर भरती व्हावी यासाठी जीवाच्या अंकाताने धावतात. अ,ब व क अशी रँक त्यांना देण्यात आलेली आहे. कमी कालावधीत पल्ला गाठलेल्या तरूणांना अ गटामध्ये तर वेळेत पल्ला गाठलेल्या तरूणांना ब श्रेणी मानांकन दिले जाते. अनेक तरुर काही सेकंदाने पल्ला गाठण्यासपासून वंचित राहतात. पल्ला गाठण्यात अपयशी ठरलेल्या तरूणांना भरती प्रक्रियेतून माघारी जाण्याचे कळविले जाते. रनिंगमध्ये यश मिळालेल्यांची कागदपत्र तपासणी होऊन लांब उडी, बॅलन्सींग व पूल-अप्स या प्रकारामध्ये शारीरिक क्षमतेची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, विद्यापीठ हद्दीमध्ये आलेल्या हजारो संख्येच्या अग्निवीरांना भावी सैनिकांना देशसेवेसाठी पाठबळ देण्याऐवजी काही व्यापार्‍यांनी लुटमारीचा धंदा थाटल्याचे चित्र आहे. पाण्याची बॉटल, चहा, नाष्ट्याबाबत तरूणांची लुटमार सुरू आहे. नगर-मनमाड रस्त्यावर सुमारे 2 किमी हद्दीपर्यंत तरूणांच्या चारचाकी वाहनांचा ताफा उभा आहे. संबंधित ठिकाणी शेकडो तरूण हे वाहनालगतच रात्रभर सैन्य दल भरतीला सामोरे गेल्यानंतर विश्रांती घेतात. दिवसभर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्यासह वैद्यकीय सोय सूविधा कॅम्प परिसरात उपलब्ध आहेत. परंतु कॅम्प बाहेर थांबणार्‍या तरूणांची मात्र परिसरातील छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांकडून अवहेलनां होत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित व्यापार्‍यांची झाडाझडती घेत तपासणी करावी. चढ्या दराने पाणी, खानपानाच्या वस्तू विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी भावी अग्निवीर सैनिकांकडून होत आहे.

देशाचे संरक्षण हेच आमचे ध्येय

कृषी व शिक्षण संशोधन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ हद्दीमध्ये अग्निवीर भरती असल्याचे समजताच समाधान वाटले होते. परंतु भरतीसाठी आल्यानंतर अग्निवीर भरतीची सर्व माहिती मिळण्यापूर्वी विद्यापीठ हद्दीमध्ये पिण्यासाठी पाण्याची बाटली चढ्या भावाने विकत घ्यावी लागली. नाष्टा व जेवणही महाग असल्याचे पाहून धडकी भरली. पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल परंतु सैन्य दलात भरती हेच आमचे ध्येय आहे.

– रवींद्र ढमाळे, भरतीसाठी आलेला तरूण, बीड

Back to top button