नगर : ग्रामसेवकांच्या ‘त्या’ प्रतापांची चौकशी | पुढारी

नगर : ग्रामसेवकांच्या ‘त्या’ प्रतापांची चौकशी

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : पात्रता व नियुक्ती नसतानाही ग्रामविकास अधिकार्‍यांच्या पदाचे काम ग्रामसेवक बेकायदेशीरपणे वर्षानुवर्षे बिनदिक्कतपणे पाहत असल्याच्या तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते सोपान रावडे यांनी केली होती. त्याची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली असून, उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याने पंचायत राज वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेवासा तालुक्यातील सोनई, घोगरगाव, बेलपिंपळगाव, नेवासा बुद्रुक, मुकिंदपूर, कुकाणा, चांदा आदी ग्रामविकास अधिकारी पदाचा दर्जा असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवक दर्जाचे अधिकारी त्यांची पात्रता व त्या ठिकाणी नियुक्ती नसतानाही गेली वर्षानुवर्षे बिनदिक्कत व बेकायदेशीरपणे पाहात असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. जिल्हा परिषदेचे गाव पातळीवरील कर्मचारी नियमानुसार मुख्यालयी न राहता शहराच्या ठिकाणी वास्तव्य करून शासन व जनतेची फसवणूक करत असल्याप्रकरणी गेल्या तीन-चार वर्षांपासून तक्रार अर्ज, पाठपुरावा, उपोषण-आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी ग्रामसेवकांच्या नव्यानेच उघडकीस आलेल्या प्रतापांच्या संबंधित बातम्यांची कात्रणे जोडून याप्रकरणीही चौकशी व कारवाईची मागणी तक्रार अर्जाद्वारे नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली.

या तक्रारीत रावडे यांनी पात्रता व नियुक्ती नसतानाही ग्रामविकास अधिकारी पदाचा कारभार करत संबंधितांनी कोट्यवधी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे खर्च केलेला असल्याने या संपूर्ण रकमेची त्यांच्याकडून वसुली करुन त्यांच्यासह त्यांना सदर बेकायदेशीर कृत्य करण्यास मोकळीक देणार्‍या, तसेच त्याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करणार्‍या नेवासा पंचायत समितीच्या वरिष्ठांचीही चौकशी करून या सर्वांवर नियमानुसार शासकीय सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी रावडे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना तातडीने याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

‘त्या’ अधिकार्‍यांच्या अडचणी वाढणार

सरळमार्गी तसेच नकोशा वाटणार्‍या ग्रामविकास अधिकार्‍यांना त्यांची नियुक्ती असतानाही राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवरुन दादागिरी करत कामकाज पाहण्यास मज्जाव करून पात्रता व नियुक्ती नसलेल्या ग्रामसेवकांच्या हाती बेकायदेशीरपणे कारभार सोपविणार्‍या नेवासा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकार्‍यांसह एका विस्तार अधिकार्‍याच्या अडचणीत यामुळे वाढ होण्याची चर्चा पंचायत राज वर्तुळात घडताना दिसत आहे.

Back to top button