नगर : बेजबाबदार प्रशासनामुळे अपघात वाढले | पुढारी

नगर : बेजबाबदार प्रशासनामुळे अपघात वाढले

सुपा, पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, प्रवाशांचे बळी जाण्यास बेजबाबदार प्रशासन जबाबदार असल्याचे चित्र आहे. अपघात केव्हा थांबणार आणि आवश्यक उपाययोजनांसाठी आणखी किती बळी प्रशासनाला हवेत, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दहा वर्षांत 450, तर आठ दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघातांच्या संख्य कमी झाली नाही, तर त्यात वाढ झाली. पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण व नगर शहराचे उपनगर असलेल्या केडगाव येेथे भूसंपादनाचे काम अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे नगरहून पुण्याकडे जाताना केडगाव वेशीजवळ, सुप्यात अपना बेकरी जवळ, नारायणगव्हाण गावाजवळ सकाळी व सायंकाळी वाहनांची कोंडी होते. या वाहन कोंडीचा प्रश्न पोलिसांना गेल्या 10 वर्षांत सुटलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. चौपदरीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध शाळा, गाव व पेट्रोल पंप वगळता सर्वत्र दुभाजक टाकण्यात आले होते.

गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल्स, ढाबा चालकांनी व्यवसाय उत्तम चालावा, यासाठी हॉटेल्स आणि ढाब्यांसमोरील दुभाजक तोडले. अशा ढाबा आणि हॉटेल्स चालकांविरूद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळा कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, या विभाग कोणाच्या दबावाखाली आहे, याचे उत्तर जनतेला मिळाले नाही. महामार्गावरून जाणारा व येणारा प्रवासी घरी सुरक्षित पोहचेल का, याची निश्चित खात्री कोणीही देऊ शकत नाही. महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे जीव तर गेलेच, पण शेकडो लोकांना अपंगत्व आले. तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच होत आहे.

समिती नेमूनही काहींच झाले नाही

या महामार्गावर अपघात नेमके कोठे होतात, का होतात, यासंदर्भात सुप्यात प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची दहा वर्षांपूर्वी बैठक झाली होती.  अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सूचविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन महामंडळ, महामार्ग पोलिस, सुपा व नगर तालुका पोलिसांचा समावेश होता. या समितीने काही उपाययोजना सूचविल्या व त्यांची काही काळ अंमलबजावणीही झाली. मात्र, संबंधित अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर या उपाययोजनांकडे दूर्लक्ष झाले.  सुमारे पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर दुभाजक टाकण्यास शिरुरपासून सुरुवातही केली होती. परंतु, काही मंडळींनी राजकीय दबावतंत्राचा वापर करून ते काम बंद पाडले.

त्यातच पूर्वीसारखी वाहने अडवून तपासणी करण्याबाबत पोलिसांवर मर्यादा आल्या आहेत. पोलिस लांबूनच वाहनांची छायाचित्रे घेतात आणि ई-चलन फाडतात. त्यामुळे एखाद्या वाहनधारकाने मद्यपान केले आहे किंवा नाही, याची खातरजमा होत नाही. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळते. महामार्गालगत सर्वच ढाबे किंवा हॉटेल्सला उत्पादन शुल्क विभागाचा परवाना नाही. तरीही खुलेआम मद्यविक्री होते. जेवणापेक्षा मद्यपानासाठी येणार्‍या ग्राहकांचीच संख्या या ढाबे आणि हॉटेल्सवर अधिक आहे.

अवजड वाहतूक रोखावी

नगर-पुणे रस्त्यावर वाघुंडे शिवारात टोलनाका असल्यामुळे जीप व कार वगळता, ट्रक, डंपरसारखी अवजड वाहने नगरहून पुण्याकडे जाताना सुपा चौकातून वडनेरमार्गे म्हसणे फाट्यावरून पुणे रस्त्यावर जातात. पुण्याहून नगरकडे येताना याच मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे सुपा चौक आणि सुपा-पारनेर रस्त्यावर अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. या वाहतुकीस तत्काळ आळा घालावा, अशी सुपा ग्रामस्थांची मागणी आहे.

सार्वजनिक बांधकाम, परिवहन, महामार्ग व नगर आणि सुपा पोलिसांनी हे अपघात रोखण्यासाठी तत्काळ बैठक घ्यावी. महामार्गावरील गावांमधील प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन प्रवाश्यांना न्याय द्यावा.

                                                 – आप्पासाहेब देशमुख, उपतालुका प्रमुख, शिवसेना

Back to top button