अगस्तीसह शिक्षक बँकेचा 30 ऑगस्टला फैसला? | पुढारी

अगस्तीसह शिक्षक बँकेचा 30 ऑगस्टला फैसला?

नगर : पुढारी वृत्तसेवा : महिनाभरापूर्वी ऐन रंगात आलेली शिक्षक बँकेची निवडणूक अचानक पुढे ढकलल्याने शिक्षक संघटनांनी खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहेत. अकोलेतील अगस्ती कारखान्यासंदर्भात सुनावणी दरम्यान खंडपीठाने सरकारवर ताशेरे ओढत म्हणणे मांडण्याला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे लवकरच अगस्ती साखर कारखान्यासह शिक्षक बँक निवडणुकांची स्थगिती उठून पुन्हा रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत आहेत. 30 ऑगस्टला त्यावर फैसला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिक्षक बँकेच्या सत्तेसाठी शिक्षक संघटनांचे चार पॅनल निवडणूक आखाड्यात उतरले.

शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात सत्ताधारी गुरुमाऊली मंडळ, ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांच्या मार्गदर्शनात ‘रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ’, डॉ. संजय कळमकर यांचे गुरुकुल मंडळ आणि राजेंद्र शिंदे यांनी तयार केलेल्या चौथ्या आघाडीत चुरशीची लढत आहे. 24 जुुलै 2022 रोजी मतदान आणि लगेच दुसर्‍या दिवशी (दि.25) मतमोजणी होती. मात्र, प्रचार रंगात असतानाच अचानक 15 जुलै रोजी सहकार विभागाने अतिवृष्टीचे कारण देत सर्वच निवडणूका आहे त्या टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँकेच्या इच्छुकांसह मतदारांच्याही उत्साहावर पाणी फिरले.

दरम्यान, राज्यात अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्याही निवडणूका घ्याव्यात, अशी मागणी करत बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनात गुरुमाऊलीच्या पदाधिकार्‍यांनी खंडपीठात धाव घेतली. 4 ऑगस्टला त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने सरकारला फटकारले. 12 सप्टेंबरपर्यंत शासनाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीबाबतही खंडपीठात सुनावणी झाली. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या असताना राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

त्यावर सरकार पक्षाने 10 दिवसांत बाजू मांडावी, तसे न झाल्यास खंडपीठ 30 ऑगस्टला निर्णय देणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसात सहकारासह शिक्षक बँक निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

 

शिक्षक बँकेच्या निवडणुकीला स्थगिती आल्याबरोबर लगेचच ‘गुरुमाऊली मंडळ 2015’ चे रामेश्वर चोपडे, महेंद्र भणभणे व बाळासाहेब सरोदे यांच्यावतीने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. त्यावर 4 ऑगस्टच्या सुनावणीनुसार शिक्षक बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

                                      – राजकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष, गुरुमाऊली

आमचा एक गट कोर्टात गेल्याने सर्वांनी दाद मागण्यात अर्थ नव्हता. मात्र आम्ही पूर्वीपासूनच बँकेची निवडणूक घेण्यात यावी, यासाठी नव्या सरकारच्या संपर्कात होतो. मंगळवारी सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली असून, या भेटीत निश्चितच सकारात्मक निर्णय होईल.
                                              -भास्करराव नरसाळे, शिक्षक नेते, गुरुकुल

Back to top button