नगर : श्री क्षेत्र वृद्धेश्वरमध्ये भाविकांची मांदियाळी | पुढारी

नगर : श्री क्षेत्र वृद्धेश्वरमध्ये भाविकांची मांदियाळी

करंजी, पुढारी वृत्तसेवा : श्री. क्षेत्र वृद्धेश्वर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त येथे स्वयंभू आदिनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह उद्योजक गणेश आव्हाड व श्री वाघेश्वरी दूध संघाचे अध्यक्ष दीपक लांडगे यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले.

सकाळपासूनच वृद्धेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देवस्थान समितीकडून येणार्‍या भाविकांसाठी दर्शन रांगेची, पिण्याच्या पाण्याची व आलेल्या भाविकांना थांबण्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली होती. श्रावणी सोमवारनिमित्त नगर मार्केटच्या व्यापारी मंडळीकडून भाविकांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती. अधूनमधून पडणार्‍या श्रावण सरीमुळे भाविकांची थोडीशी धांदल उडाली. परंतु, देवस्थान समितीने संपूर्ण दर्शन रांगेत मंडपाची व्यवस्था केल्यामुळे भाविकांची काहीशी गैरसोय यावर्षी दूर झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मात्र मढी मायंबा देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. परंतु स्थानिक पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करून वाहतूक कोंडी दूर केली.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा देवस्थान समितीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. वृद्धेश्वर येथे येणार्‍या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची गैरसोय तत्काळ दूर करू. त्या संबंधीच्या सूचना देखील देणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे देवस्थान समितीसह भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. श्रावणी यात्रोत्सवानिमित्त देवस्थानचे सर्व विश्वस्त, स्वयंसेवक, चालक-मालक संघटना, मुंबईकर मित्रमंडळ, आदिनाथ सेवा मंडळ, घाटशिरसचे ग्रामस्थ, पोलिस प्रशासन यांनी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी चांगले नियोजन केले होते. दरम्यान, या वर्षी वृद्धेश्वर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने निसर्ग नटला आहे. सर्वत्र हिरवाई पसरल्याने निसर्गरम्य वातावरण झाले आहे. त्यामुळे भाविकांची वृद्धश्वरला भाविकांची दररोज गर्दी होत आहे. तिसर्‍या सोमवारी भाविकांच्या गर्दीने उच्चांक केला होता.

Back to top button