मत्स्य उत्पादनातून जिल्हा परिषेदला ठेंगा; शेवगाव तालुक्यातील पाझर तलावांचा लिलाव न करताच मासेमारी | पुढारी

मत्स्य उत्पादनातून जिल्हा परिषेदला ठेंगा; शेवगाव तालुक्यातील पाझर तलावांचा लिलाव न करताच मासेमारी

रमेश चौधरी

शेवगाव : मत्स्योत्पादन लिलावाची शासनाला माहिती देण्यास ग्रामपंचायत उदासीनता दाखवित असून, लिलावातील वीस टक्के रक्कम जिल्हा परिषदेला देण्यास चुकारपणा करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिळणार्‍या या उत्पन्नाचा अवमेळ झाला आहे. तालुक्यातील 31 पाझर तलावांपैकी फक्त सहा ग्रामपंचायतींनीच या लिलावाची माहिती सादर केल्याने इतर पाझर तलावातील माशांचा परस्पर ‘बेत’ केला जातो की काय, असा संशय व्यक्त होत आहे .

तालुक्यातील अनेक गावांत असणार्‍या पाझर तलावांतील माशांचा लिलाव झाल्यानंतर त्यातील वीस टक्के रक्कमेचा भरणा जिल्हा परिषदेकडे करावा लागतो. मात्र, काही वर्षांपासून अनेक ग्रामपंचायतींनी हा भरणा केला नसल्याने जिल्हा परिषदेचे उत्पन्न बुडण्याची शंका निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्षी पाझर तलाव भरल्यानंतर वर्षभर पाणी टिकणार्‍या तलावात ग्रामपंचायत अथवा या संस्थेने दिलेली एजन्सी मत्स्यबीज सोडून जास्तीत जास्त मस्य उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. काही कालावधीत या माशांचा जाहीर लिलाव करावा लागतो.

लिलावातील वीस टक्के रक्कमेचा भरणा जिल्हा परिषदेकडे करावा लागतो, तर 80 टक्के रक्कम त्या तलावाची दुरुस्ती, गाळ काढणे, काट्या तोडणे, सांडवा दुरुस्ती अशी तलाव देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावी लागते. ही रक्कम दुसरीकडे वापरता येत नाही. परंतु, याबाबत त्या गावांतील ग्रामस्थांत जागृती झाली नसल्याने याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याचा गैरफायदा घेऊन काही ग्रामपंचायती कागदोपत्री लिलाव करून माशांचा परस्पर बेत करत असाव्यात, असा संशय आहे.

शासनाने पावसाबरोबर इतर पाण्याचे स्त्रोत असणार्‍या गावात अनुदानाने पाझर तलाव तयार करून ते ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केले आहेत. शेवगाव तालुक्यात सन 1985 पासून खुंटेफळ, दहिगाव-ने, राक्षी, दहिफळ जुने, वरुर खु, शिंगोरी, लाडजळगाव, अधोडी, गोळेगाव, बोधेगाव, रांजणी, आंतरवाली बुद्रुक, वाडगाव, मुर्शदपुर, गा.जळगाव, ठाकूर निमगाव, राणेगाव, शेवगाव, शेकटे खुर्द, लखमापुरी, कोनोशी, नागलवाडी, भातकुडगाव, वडुले खुर्द, आखतवाडे, सालवडगाव, चापडगाव, मंगरुळ बुद्रुक, खरडगाव, हासनापूर, कोळगाव अशा 31 गावांत पाझर तलाव करून ते ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेले आहे.

तालुक्यातील खुंटेफळ, वाडगाव, चापडगाव, खरडगाव, कोळगाव एवढ्याच ग्रामपंचायतींनी आपल्या लिलावातील वीस टक्के रकमेचा भरणार जिल्हा परिषदेला केला आहे. दहिगाव-ने तलावात पाणी रहात नाही. नागलवाडी तलावात खोडसाळपणा केला जातो. माळेगाव व ठाकूर निमगाव या दोन गावांत अधिकार्‍यांचा वाद होत असल्याची माहिती आहे. मात्र, ज्या तलावात पाणी साठा आहे. तेथे मस्योत्पादन घेतले जात असताना जिल्हा परिषदेचा भरणा होत नाही, तसेच लिलावातील 80 टक्के रक्कम त्या तलावावरच खर्च होते की नाही, याची एकदा चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात गावचे पाझर तलाव पाण्याने डबडब राहतील व त्याचा ग्रामस्थांना फायदा होईल.

मस्त्योत्पादन माहिती देण्यास टाळाटाळ!
प्रत्येक वर्षी भरपूर पाऊस येतोच असे नाही. पंरतु ज्या वर्षी तलावात पाण्याचा साठा होतो, त्याचे अथवा पाणी येत नसेल, तर त्या संबंधीचे लेखी पत्र पंचायत समितीकडे सादर करावे लागते. मात्र, तालुक्यातून असे पत्र येत नाहीत. मस्योत्पादन केल्यास ती माहिती देण्यासही टाळाटाळ होत असल्याने जिल्हा परिषद उत्पन्नाचा अवमेळ होत आहे. पाझर तलाव असणारी काही गावे जायकवाडी फुगवट्याखाली, तर काही गावे पाटपाण्याखालची आहेत त्यामुळे तेथील तलावांत पाणी साठ्याला अडचण येत नसावी.

Back to top button