आढळगावचे आरक्षण वादात | पुढारी

आढळगावचे आरक्षण वादात

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : आढळगाव गट व गणाचे आरक्षण वादात अडकण्याची शक्यता असून, काढलेल्या आरक्षणावर हरकती घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या गटाची आरक्षणासंदर्भातील हरकत मान्य केली गेल्यास जिल्ह्याची निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. आढळगाव गटात 2007 मध्ये अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील उमेदवार निवडून आला होता. तर त्याच गटातील पेडगाव पंचायत समिती गणही याच आरक्षणात राखीव होता.

त्याच प्रवर्गातील व्यक्ती त्या गणात निवडून आली होती. आता आढळगाव गट व गणात पुन्हा तेच आरक्षण निघाले आहे. राजपत्रात आढळगाव गटात ओबीसी महिला आरक्षण दाखविले, तर पेडगाव गणात सर्वसाधारण आरक्षण दाखविले आहे. राजपत्रातील याच मुद्याच्या आधारे आढळगाव गटात आरक्षण निघालेे. आरक्षणासंदर्भातील गोंधळ समोर आला सगळ्यात मोठा गोंधळ राजपत्रात झाला व ती चूक जिल्हाधिकारी कार्यालयाने न तपासता आरक्षण काढले. आढळगाव गटात काँग्रेसचे अनिल ठवाळ विजयी झाले होते. विजयी उमेदवारांच्या जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे ठवाळ एससी प्रवर्गातून विजयी झाल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वी गट-गण आरक्षणासाठी राजपत्र तयार केले, त्यावेळी अनिल ठवाळ ओबीसी महिला प्रवर्गातून विजयी झाल्याचे दाखविण्यात आले.

.. आरक्षणाबाबत हरकत घेणार
राजेंद्र म्हस्के म्हणाले आढळगाव गटात जे आरक्षण निघाले आहे ते चुकीचे असून याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालायकडे कागदपत्रांच्या पुराव्यासह हरकत नोंदवणार आहोत.

प्रशासनातील गोंधळामुळे ही वेळ
जिल्हा परिषद गटाचे आरक्षण काढताना संबधित यंत्रणेने कागदपत्रांची खातरजमा केलेली नाही. पूर्वीच्या आरक्षणाचा संदर्भ लक्षात घेतला गेला नाही. याबाबत आम्ही हरकत नोंदवणार असून न्यायालयातही धाव घेण्याची आपली भूमिका असल्याचे शेडगावचे माजी सरपंच विजय शेंडे यांनी स्पष्ट केले.

Back to top button