जामखेड : दोन वर्षांनंतर रंगला कुस्त्यांचा फड | पुढारी

जामखेड : दोन वर्षांनंतर रंगला कुस्त्यांचा फड

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जवळा येथील जवळेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त नामवंत पैलवानांच्या जंगी कुस्त्यांचा फड रंगला. यात सोलापूर, नगर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 124 पहिलवानांनी सहभाग घेतला. विजेत्यांना जवळा ग्रामस्थांतर्फे मानाचा फेटा व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सरपंच प्रशांत शिंदे, ज्योती क्रांती समूहाचे प्रमुख अजिनाथ हजारे, पिंपरखेडचे सरपंच बाबुराव ढवळे, माजी उपसभापती दीपक पाटील, युवा नेते राहुल पाटील, माजी सरपंच अनिल पवार, दशरथ हजारे, उमेश रोडे, संतराम सूळ, डॉ. दीपक वाळुंजकर, प्रशांत पाटील, मारुती रोडे, संजय आव्हाड, बाबा महारनवर, अशोक पठाडे यांच्या हस्ते झाले.

यात लहान व मोठ्या गटातून 124 कुस्त्या झाल्या. 124 पैलवानांनी कुस्त्यांचे फड गाजवत 60 मल्लांनी कुस्त्या जिंकल्या, तर दोन कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. शेवटची 21 हजारांची कुस्ती जवळ्याचे पैलवान रोहित आव्हाड व करमाळाचा पैलवान किरण मिसाळ, तर दोन नंबरची 18 हजारांची कुस्ती जवळ्याचा पैलवान संकेत हजारे व जेऊरचा पैलवान सुनील दिर्गुळे यांच्यात झाली. या दोन्ही कुस्त्या चुरशीच्या झाल्या. शेवटच्या दोन्ही कुस्त्या जवळ्याचे रोहित आव्हाड व संकेत हजारे यांनी जिंकल्या. यावेळी पंच म्हणून बाबा महारनवर, संजय आव्हाड, राजू वस्ताद, माऊली कोल्हे, सुग्रीव ठकान, राहुल आव्हाड यांनी काम पहिले.

Back to top button