नगर : शिर्डीत कॅन्सरतज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद | पुढारी

नगर : शिर्डीत कॅन्सरतज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद

नगर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कर्करोगतज्ञ संघटनेची सातवी वार्षिक वैद्यकीय परिषद शुक्रवारी ( दि. 15 जुलै) ते रविवार (दि. 17 जुलै) या दरम्यान शिर्डी येथे होत आहे. या परिषदेत जागतिक कर्करोग नियंत्रण संघटनेचे डॉ. अनिल डी. क्रूझ, ज्येष्ठ कॅन्सरतज्ज्ञ डॉ. पूर्वीश पारिख यांच्यासह राज्य व देशभरातील सुमारे दोनशे कॅन्सरतज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे कार्यक्रम संचालक कॅन्सरतज्ज्ञ डॉ. तुषार पाटील व संयोजक कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी दिली.

डॉ. सतीश सोनवणे यांनी अभिनेत्री मनिषा कोईराला यांच्या उपस्थितीत कॅन्सरवर प्रभावी उपचारांनी मात केलेल्या महिलांच्या मुलाखतींचा कार्यक्रम घडवून आणत कॅन्सर रुग्णांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण केली. अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे कॅन्सरबाबत जागृती झाली. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

डॉ. सोनवणे म्हणाले, की देशात वर्षभरात सुमारे 15 लाख रुग्णांना कर्करोग होतो. यातील 7 ते 8 लाख रुग्णांचा मृत्यू होतो. अहवालानुसार कॅन्सर रुग्णांची संख्या दरवर्षी 12 टक्यांनी वाढत आहे. यात मुख, फुफ्फुस, स्तन, गर्भाशयाचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. या परिषदेत कॅन्सर नियंत्रण, अत्याधुनिक उपचार, समाजोपयोगी उपक्रमांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती डॉ. तुषार पाटील, डॉ. सतीश सोनवणे, सहसंयोजक समितीचे सचिव डॉ. रोहन खर्डे व डॉ. भूषण निकम यांनी दिली.

Back to top button