नगर : टवाळखोरांना पोलिसांनी धोपटले | पुढारी

नगर : टवाळखोरांना पोलिसांनी धोपटले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नीलक्रांती चौकात रस्त्याने पायी जाणार्‍या मुलीला कट मारून आवाज दिल्याने दमिनी पथकातील पोलिसांनी दुचाकीवरील तीन टवाळखोरांना पाठलाग करून चांगलाच चोप दिला. पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये हजर करून समज दिली. उद्या त्यांच्या पालकांना बोलविण्यात आले आहे.

दहावी-बारावीचा निकाल लागल्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी नगर शहरामध्ये विद्यार्थी गर्दी करीत आहेत. एसटी बस सुरू झाल्याने मुली महाविद्यालयात येऊ लागल्या आहेत. मात्र, त्या मुलीना महाविद्यालय व रस्त्यावर टवाळ खोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे पोलिसांची दामिनी पथक महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घालीत आहे.

मंगळवारी दुपारी दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौकात एक मुलगी महाविद्यालयातून रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर पाठीमागून आलेल्या तिघांनी तिला कट मारला आणि मोठा आवाज दिला. ही घटना दामिनी पथकातील पोलिस हवालदार बाळासाहेब पोकळे, सचिन कोळेकर यांनी पाहिली. त्यावेळी पोलिस कर्मचारी चहाच्या टपरीवर चहा पीत होते. घटना पहिल्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी चहा बाजूला ठेवला आणि दुचाकीवर जाणार्‍या त्या मुलांचा पाठलाग केला. ते तीन तरुण न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये जाऊन थांबले होते. पोलिसांनी पळत जाऊन एका-एकाला धरून चांगलाच चोप दिला. त्यातील एक जण पळून गेला, तर अन्य दोघांना पकडून भरोसा सेलच्या कार्यालयात हजर केले. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले असून, उद्या त्यांच्या पालकांना बोलविले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

म्हणे आम्हाला वडील नाहीत..

त्या टवाळखोर तरुणांना दामिनी पथकाच्या पोलिसांनी पकडून भरोसा सेलमध्ये हजर केले. पोलिस अधिकार्‍यांनी विचारपूस करताना ‘तुमचे वडील काय करतात’? असे विचारले असता, ते दोन्ही महाभाग ‘आम्हाला वडील नाही’, असे म्हणाले. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर ते बोलते झाले अन् वडील आल्यानंतर त्यांनीही झोडपून काढले.

अनेक मुलींनी शिक्षण सोडले

महाविद्यालयात येणार्‍या मुलींना रस्त्याने टवाळखोरांनी त्रास दिल्याने आतापर्यंत अनेक मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागले आहेे. त्यामुळे आता महाविद्यालयातील टवाळखोरांविरुद्ध चांगली मोहीम उघडली आहेे. महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण कोणालाही थांबू दिले जात नाही.

दामिनी पथक प्रत्येक महाविद्यालयात फेरी मारत आहे. महाविद्यालयाच्या आवारात अथवा शहरातील रस्त्याने मुलींची छेड काढणार्‍या टवाळखोरांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

                                                     – पल्लवी उबरहंडे-देशमुख, पोलिस उपनिरीक्षक

Back to top button