नगर : मंडलाधिकार्‍यास केली धक्काबुकीः दोघे ताब्यात | पुढारी

नगर : मंडलाधिकार्‍यास केली धक्काबुकीः दोघे ताब्यात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : रस्ता खुला करण्यासाठी गेलेले संगमनेरच्या मंडलाधिकारी बापूसाहेब ससे यांना चिखली येथील तिघांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील चिखली येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात साखर कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघा जणांना अटक केली आहे, मात्र या घटनेतील मुख्य सुत्रधार गायब झाला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील चिखली गावातील सर्वे नंबर 46 मध्ये रस्ता खुला करण्यास मंडलाधिकारी बापूसाहेब ससे व तलाठी राठोड पोलिस बंदोबस्त घेऊन महसूल विभागाच्या अंडर येणारा रस्ता खुला करत होते. त्यावेळी चिखली येथील रहिवासी बाळासाहेब भगवान मेमाने, जालिंदर भगवान मेमाने व त्यांच्या नात्यातील ऋषिकेश वाळीबा कर्पे (रा. पिंपळगाव कोंझिरा) हे तिघे घटनास्थळी आले. तुम्ही पैसे खाऊन काम करता. आम्ही तुम्हाला रस्ता खुला करू देणार नाही, असे जोराजोराने म्हणत ऋषिकेश कर्पे याने मंडलाधिकारी ससे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. जालिंदर मेमन म्हणाला, मी मिलिटरीत होतो. त्यामुळे तुम्हाला गोळ्या घालील, अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणून ते पसार झाले.

याबाबत मंडलाधिकारी बापूसाहेब ससे यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा व शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी बाळासाहेब भगवान मेमाने व जालिंदर भगवान मेमाने (रा. चिखली) या दोघांना अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पो. नि. मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. नि. नयन जाधव हे करीत आहेत.

Back to top button