नगर : उद्या जाहीर होणार नगरपरिषदांची मतदार यादी | पुढारी

नगर : उद्या जाहीर होणार नगरपरिषदांची मतदार यादी

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदा व नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरु आहे. या नगरपरिषदांची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 1 जुलैला जाहीर होणार होती. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने या कार्यक्रमास मुदतवाढ दिली. त्यामुळे आता मंगळवारी (दि.5) अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणुकीचा बिगूल कधी वाजतो, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नगरपरिषदांची तसेच नेवासा नगरपंचायतीची आरक्षणासह अंतिम प्रभागरचना पूर्ण झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम 10 जून रोजी जाहीर केला. या मतदार यादीसाठी 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्याचे निर्देश आयोगाने दिले. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर हरकती मागवून, त्यावर सुनावणी घेऊन 1 जुलै 2022 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले होते.

त्यानुसार नऊ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या मतदार यादीचे काम सुरु होऊन सुनावणीचे काम सुरु होणार होते. तोच आयोगाने 28 जून रोजी यामध्ये अंशत: बदल करीत अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली होती.

Back to top button