‘गर्भगिरी’ औषधी वनस्पतींसाठी नंदनवन, वनविभागाचे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र  | पुढारी

‘गर्भगिरी’ औषधी वनस्पतींसाठी नंदनवन, वनविभागाचे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र 

शशी पवार

जेऊर : नगर तालुक्यात सुमारे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र वन विभागाचे आहे. त्यामध्ये विविध जातींच्या दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती आढळून येत आहेत. त्याच बरोबर वन्य प्राणी व पक्ष्यांचा मुक्तसंचार असल्याने तालुक्यातील वनक्षेत्र हे नंदनवन ठरत आहे. तालुक्यातील चार मंडळांमध्ये मिळून वन विभागाचे 7 हजार 220 हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील सुमारे 750 हेक्टर क्षेत्र आर्मीचे (डेअरी फार्म) आहे. जेऊर मंडलामध्ये सुमारे दोन हजार 200 हेक्टर क्षेत्र असून, त्यातील 500 हेक्टर क्षेत्र आर्मीचे आहे.

येथे खडकाळ व तीव्र उताराची जमीन असल्याने कडूलिंब,बाभळ या झाडांची संख्या जास्त आहे. कौडगाव मंडलामध्ये एक हजार 120 हेक्टर क्षेत्र वन विभागाचे असून, यातील 240 हेक्टर क्षेत्र आर्मीचे आहे. येथे मुरमाड व काळवट जमीन आढळून येते. त्यामुळे येथे पळस, खैर, चिंच, कडूलिंब, बाभळ, करवंद, अशी विविध झाडे आहेत.

गुंडेगाव मंडळात एक हजार 900 हेक्टर वनविभागाचे क्षेत्र असून, खडकाळ, सपाट, पठारी भाग आढळतो. येथे कडूलिंब व बाभळ याच वृक्षांचे प्रमाण अधिक आढळते. नगर मंडळात दोन हजार हेक्टर क्षेत्र असून, येथेही मुरमाट व खडकाळ जमीन अधिक आढळते. येथे कडूलिंब, बाभळींचे प्रमाण अधिक आढळते.

तालुक्यात विविध जातींच्या वृक्षांबरोबर वन्य प्राणी व पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगांत पोषक वातावरण तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी बनविण्यात आलेल्या पाणवठ्यांमुळे वन्य प्राणी व विविध जातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आढळते. प्रामुख्याने हरीण, चिंकारा, काळवीट, मोर, लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, साळींदर, ससा, मुंगूस, घोरपड, विविध जातींचे सर्प या प्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात आढळतो. तसेच बिबट्यांचे वास्तव्य देखील तालुक्यात आढळून येत आहे.

पुण्याचा पुन्हा डंका : बंदिस्त हवेतील कोरोना विषाणू नष्ट करणारे प्लगइन यंत्र तयार

तालुक्यातील डोंगररांगांमध्ये विविध जातींच्या आयुर्वेदिक वनस्पती आढळून येत आहेत. वैदिक काळापासून आपल्याकडे औषधी वनस्पतींचा वापर करण्यात येत आहे. तालुक्यातील डोंगरात गुळवेल, कडूलिंब, अक्कलकाढा, रानतुळस, आडुळसा, शिंदाड माकड, सागर गोटा, अर्जुन सादडा, रिठा, पळस, बारतोंडी, टणटणी, तरवड, निर्गुडी, कोरपड, घायपात, अंजल, शतावरी, तसेच विविध प्रकारच्या औषधी रानभाज्या आढळून येत आहेत. या वनस्पतींना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे.

औषधी वनस्पतींपासून अपचन, हात पाय लचकणे, सूज, खरचटणे व जखम शुगर, मूळव्याध, मुतखडा अशा विविध रोगांवर औषध बनविण्यात येत असते. तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील औषधी वनस्पतींचा उपयोग होत असतो.
वनविभागाच्या या नंदनवनाचे जतन व संवर्धन करण्याचे काम उपवन संरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक जे.डी. बोंदके, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, जेऊर वनपाल शैलेश बडदे, कौडगाव वनपाल सचिन शहाणे आणि गुंडेगाव वनपाल अनिल गावडे, नगर वनपाल अशोक शरमाळे, वनरक्षक मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी करत आहेत.

आयुर्वेदामधून आजारावर मुळासहीत उपचार केले जातात. ज्या आजारासाठी उपचार केले जातात, त्या आजाराबरोबरच भविष्यातील इतर आजारांचे संभाव्य धोके कमी होत असतात. आयुर्वेदाने जास्त गुण येत असल्याने दिवसेंदिवस आयुर्वेदाकडे लोकांचा कल वाढलेला आहे.
-डॉ. तुषार देशपांडे (एम.डी. आयुर्वेद)

नागरिकांनी जंगलातील हस्तक्षेप थांबवा
नगर तालुक्यातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती, तसेच विविध वन्यप्राणी आढळून येतात. त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी वन विभाग योग्य ती काळजी घेतच आहे. परंतु नागरिकांनी जंगलातील आपला हस्तक्षेप थांबवणे गरजेचे आहे.
-मनेष जाधव, वनरक्षक, वनविभाग

Back to top button