राज्यात १३ कोटी १६ लाख ३९ हजार मे. टन उसाचे गाळप, साखर निर्यात बंदी | पुढारी

राज्यात १३ कोटी १६ लाख ३९ हजार मे. टन उसाचे गाळप, साखर निर्यात बंदी

  प्रतिनिधी : महेश जोशी
  भारत देशाने यावर्षी जगात साखर उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला असुन राज्यात १०१ सहकारी आणि ९९खाजगी कारखान्यांनी २ जुन पर्यंत रेकॉर्डब्रेक १३६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेतले असुन दैनदिन गाळप क्षमतेपेक्षा यंदाचे हंगामात ३ कोटी २ लाख ७५ हजार मे. टन जादा उसाचे गाळप केले. पावसाळा तोंडावर येवुन ठेपला असुन १७० कारखान्यांची धुराडी बंद झाली ३० कारखाने अजुनही सुरू आहेत मराठवाडयात यंदा सर्वाधीक २ लाख टन उस गाळपाअभावी शेतात उभा आहे.
त्यामुळे या शेतक-यांना आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नाही. पुढच्या हंगामातही मोठया प्रमाणांत उसाची उपलब्धता असल्याने चालु वर्षी उस गाळपासाठी शेतकरी रडकुंडीला आला तसाच प्रकार पुढच्या वर्षी होणार असल्याने बहुतांष शेतक-यांनी खोडवा उस नांगरून टाकला आहे. राज्यात २ जुन पर्यंत १३ कोटी १६ लाख ३९ हजार मे टन उसाचे गाळप झाले असुन त्यापासुन १३६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे तर राज्याचा साखर उतारा १०.४० टक्के मिळाला आहे. इथेनॉलचेही उत्पादन मोठया प्रमाणांत झाले आहे.
  राज्यात उसाची एफआरपी ४२ हजार कोटीची, इथेनॉल ९ हजार कोटी, सहवीज निर्माती ६ हजार कोटी, रेक्टीफाईड स्पीरीट ५ हजार कोटी, मोलॅसिस १ हजार कोटी, जीएसटी ३ हजार कोटी, कारखाना मशिनरी ६ हजार कोटी, डिस्टीलरी मशिनरी ७ हजार कोटी आदी अशी एकुण १ लाख कोटी रूपयांची आर्थीक उलाढाल असलेला साखर उद्योग जो एकेकाळी सहकाराने फुलला होता आता मात्र त्याला खाजगीची दृष्ट लागली आहे. निम्म्यापेक्षा अधिक कारखाने खाजगी झाल्याने खुल्या स्पर्धेत लवकरच या उद्योगाची पावले खाजगीकरणाकडे पडत चालली आहेत.
त्यामुळे यापुर्वी सहकाराने मजबुत केलेल्या ग्रामिण अर्थकारणाची पाळेमुळे उध्वस्त होवुन शहरी नेतृत्व प्रगतीकडे झेपावत असतांना ग्रामिण नेतृत्व आणखी खुजे होत चालले आहे ही भिती वाटते. केंद्रात नव्यानेच अमित शहा सहकार मंत्री झाले आहे त्यांनी यात लक्ष घालुन या उद्योगाचे राष्ट्रीयकरण करावे अशीहीचर्चा आता सुरू झाली आहे.
केंद्र शासनाने पावसाळा लक्षात घेवून साखर निर्यात बंदी केली आहे. महाराष्ट्र राज्यातुन चालू हंगामात सर्वाधिक ९० लाख मे. टन साखर कुठल्याही अनुदानाशिवाय निर्यात झाली आहे. साखर निर्यात बंदीचा फारसा फरक पडणार नाही असे साखरधुरीणांचे मत आहे. उस हे पीक नगदी असुन भूसारपेक्षा याच पिकातुन शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी उस शेतीकडे वळाला, पर्यन्यमान ब-यापैकी आहे पण शेतातील उस गाळपासाठी जात नसल्याने त्याच्यापुढे यंदाचे हंगामात अनंत समस्या उभ्या राहिल्या.
साखर कारखान्यांनी सुरूवातीला गेटकेन उसाला प्राधान्य देवुन त्याच्या तोडी केल्या त्यामुळे गटातील जानेवारी महिन्यांत तोडणीला आलेला उस मे महिना संपल्यानंतर शेवटी शेवटी गाळपाला गेला. काही शेतक-यांनी उसाच्या खोडक्या होत असल्यांने उस गाळपाला जात नसल्याने तसाच शेतात पेटवून दिला. यंदा १२८ वर्षात विकमी सरासरी उष्णतामान नोंदले गेले त्याचा फटका उस तोडणी कामगारांना बसला ते अधिकच्या तपमानात उस तोडु शकत नसल्यांने परतीच्या मार्गावर गेले.
विभाग कारखाने त्यांनी केलेले उसगाळप मे टनात, साखर उत्पादन लाख क्विंटल मध्ये तर उतारा टक्केवारीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
कोल्हापुर (३६ कारखाने) (२ कोटी ५४ लाख ६९ हजार मे टन) (३ कोटी ४१ हजार क्विंटल) (११.८० टक्के), पुणे (३० कारखाने) (२ कोटी ६९ लाख ८० हजार मे टन) (२ कोटी ९१ लाख १८ हजार क्विंटल) (१०.७९ टक्के), सोलापुर (४७ कारखाने) (३ कोटी ११ हजार में टन) (२ कोटी ८३ लाख ९० हजार क्विंटल) (९.४६ टक्के), अहमदनगर (२८ कारखाने) (१ कोटी ९९ लाख २९ हजार मे टन) (१ कोटी ९९ लाख ६४ हजार क्विंटल) (१०.०२ टक्के), औरंगाबाद (२५ कारखाने) (१ कोटी ३१ लाख ५९ हजार मे टन) (१ कोटी २८ लाख २० हजार क्विंटल) (९.७४ टक्के), नांदेड (२७ कारखाने) (१ कोटी ४६ लाख ३४ हजार में टन) (१ कोटी ५२ लाख ३८ हजार क्विंटल) (१०.४१ टक्के), अमरावती (३ कारखाने) (१० लाख ३ हजार मे टन) (९ लाख ६७ हजार क्विंटल) (९.६४ टक्के), नागपुर (४कारखाने) (४लाख ५४ हजार में टन). (३ लाख ८१ हजार क्विंटल) (८.३९ टक्के), मागील हंगामापेक्षा यंदाचे हंगामात इथेनॉल उत्पादनामुळे सरासरी साखर उता-यात ०.१० टक्याची घट झाली आहे.

Back to top button