सावधान! राज्यात एकीकडे उष्णतेच्या झळा तर ‘या’ भागात पुन्हा अवकाळी बरसणार | पुढारी

सावधान! राज्यात एकीकडे उष्णतेच्या झळा तर 'या' भागात पुन्हा अवकाळी बरसणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकीकडे उष्णतेच्या झळा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी जोरदार बरसणार आहे. 14 मेपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागांत पाऊस हजेरी लावणार आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. दरम्यान, राज्यात उष्णतेच्या झळा, उकाडा सुरूच असून, बुधवारी (दि. 8) अकोला शहरात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 43.5 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले आहे.
राज्यात उष्णतेची लाट सुरूच असून, राज्याचा सर्वच भाग होरपळून निघत आहे. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळी उकाड्यापासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर किंवा वातानुकूलित सेवा सुरू केली तरी बहुतांश वेळा उकाडा जास्त जाणवत आहे. आता मात्र थोड्याफार प्रमाणात उष्णतेच्या झळा आणि उकाड्यापासून बचाव होण्याची शक्यता वाढली आहे. ईशान्य राजस्थान ते दक्षिण कर्नाटकपर्यंत मध्य महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक पार करून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.  त्यातच विखंडित वारेही वाहत आहेत. या दोन्हीच्या परिणामामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा

Back to top button