पुढारी ऑनलाईनडेस्क : नैऋत्य मान्सूनने उत्तरेकडील राज्यातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. त्यापूर्वी देशातील अनेक राज्यात मान्सून जोरदार कोसळत आहे. दरम्यान पुढील दोन दिवस (१, २ ऑक्टोबर) कोकणासह लगतच्या भागात हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती पुणे विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी 'X' अकाऊंटवरून दिली आहे. (Heavy Rain)
डॉ. होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दक्षिण कोकण, गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र गोव्यापासून ११० किमी, रत्नागिरीपासून २५० किमी. वर असून, ते आज (दि.३०) संध्याकाळपर्यंत पणजी व रत्नागिरीदरम्यान कोकण-गोवा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा आणि कोकणाला पुढील दोन दिवस रविवारी (दि.१) आणि सोमवारी (दि.२) 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी पुढील २४ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Heavy Rain)
हवामान विभागाने गुरूवारी (दि.२८) दिलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारी (दि.३०) आणि रविवारी (दि.१ऑक्टो) या दोन दिवसात कोकण आणि लगतच्या भागात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण कोकणाकडे अधिक पावसाची शक्यता आहे, असेही होशाळीकर यांनी दिलेल्या माहितीत सांगितले. Heavy Rain)
सोमवारपासून (दि.२५) नैऋत्य राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, आज (दि.३०) मान्सूनने जम्मू काश्मीर, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, दिल्लीचा काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम राजस्थानातील काही भाग आणि पश्चिम राजस्थानातील बहुतांशी भागातून नैऋत्य मान्सून परतीला आज (दि.३०) सुरूवात झाली आहे. तसेच पुढील ३ ते ४ दिवसात उर्वरित जम्मू काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यात काही प्रमाणात मान्सून परतीला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. तर पूर्व उत्तरप्रदेश बहुतांशी भाग, राजस्थानचा उर्वरित भाग आणि गुजरातच्या काहीशा भागातून मान्सून परतीला सुरूवात झाली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. या संदर्भातील माहिती डॉ. के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.