Heavy Rain : महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये पावसाच्या जोरदार हजेरीची शक्यता | पुढारी

Heavy Rain : महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये पावसाच्या जोरदार हजेरीची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Heavy Rain : पुढील दोन आठवड्यांत देशभरात दमदार पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामध्ये हवामान खात्याने महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. मात्र दुपारनंतर पुन्हा हवामानात बदल दिसून आला. दिवसभर दमट आणि ढगाळ वातावरण राहिले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच उद्या आणि परवा म्हणजेच १६ आणि १७ सप्टेंबरपर्यंत विदर्भ तसेच कोकण आणि गोव्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या विविध भागात मुसळधार पावसाचाही इशारा हवामान खात्याने दिला आहे. या व्यतिरिक्त १६ सप्टेंबरपर्यंत पूर्व मध्य प्रदेशातील विविध भागात तर पश्चिम मध्यप्रदेशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Heavy Rain)

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा, छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता असून उत्तराखंडच्या काही भागामध्येही मुसळधार पावसाचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा तसेच दक्षिण आणि पश्चिम उत्तरप्रदेशातही पावसाच्या हजेरीची चिन्हे आहेत. (Heavy Rain)

Back to top button