NCP Leader Jayant Patil : मोठी बातमी! जयंत पाटील यांना ईडीचा समन्स | पुढारी

NCP Leader Jayant Patil : मोठी बातमी! जयंत पाटील यांना ईडीचा समन्स

पुढारी ऑनलाइन डेस्क : NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) उद्या 12 मे चा समन्स बजावला आहे. आयएल आणि एफएसच्या कथित घोटाळ्या प्रकरणी  हा समन्स बजावण्यात आला आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे आयएल आणि एफएस प्रकरण

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या वर जोरदार टीका केली होती. त्याचा काही संदर्भ या नोटीसी मागे आहे का अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात सुरू आहे.

आयएल आणि एफएस कंपनी काय आहे

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) ही एक भारतीय राज्य-अनुदानित पायाभूत सुविधा विकास आणि वित्त कंपनी आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी तयार केली आहे.

IL&FS ची स्थापना 1987 मध्ये “RBI नोंदणीकृत कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी” म्हणून तीन वित्तीय संस्थांनी केली, जसे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI), यांनी प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्त आणि कर्ज प्रदान करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली.

अशा नोटीसांमुळे राष्ट्रवादी आणखी भक्कम होते – विद्या चव्हाण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना जयंत पाटील यांना आलेल्या या समन्समुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान याबाबत अद्याप जयंत पाटील यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण या समन्स प्रकरणी भाजपवर थेट आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना यापूर्वीही ईडीने समन्स बजावले आहे. ते काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत जयंत पाटील यांना कधीही ईडीकडून समन्स आलेले नव्हते. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजप आता थेट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देत आहे, असा थेट आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.

तसेच यावेळी त्या असेही म्हणाल्या की शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना यापूर्वी ईडीच्या अशा नोटीस आल्या आहेत. मात्र, आम्ही याला घाबरत नाही. उलट यामुळे राष्ट्रवादी आणखी भक्कम होत असते, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या.

हे ही वाचा :

Maharashtra Political Crisis LIVE Updates | सत्तासंघर्षावर आज हायव्होल्टेज निकाल, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स

‘आधार’साठी शिक्षक दारोदारी; आधार लिंक नसल्याने राज्यातील १ लाख शिक्षकांचे पगार अडकले

 

Back to top button