शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार? असीम सरोदेंनी सांगितल्या निकालाच्या चार शक्यता | पुढारी

शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार? असीम सरोदेंनी सांगितल्या निकालाच्या चार शक्यता

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल या आठवड्यात कोणत्याही दिवशी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या आमदारांची अपात्रता, राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्ष निवडीची वैधता या तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याची उत्सुकता आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या खटल्याची प्रदीर्घ अशी सुनावणी झाली आहे. त्यावरून कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत. त्यानुसार पहिली शक्यता म्हणजे आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणं सोपा निर्णय म्हणून अवलंबला जाऊ शकतो. असे झाल्यास अपात्रते बाबतची कार्यवाही करून निर्णय आताचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घ्यावा की, तेव्हाचे उपाध्यक्ष व अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या असणाऱ्या नरहरी झिरवळ यांनी घ्यावा याबाबत सर्वोच्च न्यायालयाला स्पष्टता सकारणं करावी लागेल.

दुसरी शक्यता म्हणजे बहुमत चाचणी करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काढलेला आदेशच रद्द ठरवला जाऊ शकतो. कारण राज्यपालांनी यांनी फ्लोअर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला, तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता.

असीम सरोदेंनी व्यक्त केलेली तिसरी मोठी शक्यता म्हणजे पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून थेट सर्वोच्च न्यायालयच १६ आमदारांना अपात्र ठरवू शकते. यासाठी घटनेतील कलम १४२ चा आधार न्यायालय घेऊ शकते. बहुमत चाचणीचा आदेश ही राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याने ती रद्द ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.

यातील चौथी शक्यता असीम सरोदेंनी सात जणांच्या घटनापीठाची वर्तवली आहे. “एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे १० व्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते”, असं असीम सरोदेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Back to top button