पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना मिळणार 10 मिनिटांचा जादा वेळ | पुढारी

पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना मिळणार 10 मिनिटांचा जादा वेळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्याची पद्धत बंद केली आहे. मात्र, परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. पालक, विद्यार्थ्यांनी केलेली मागणी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, हा निर्णय घेतल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे. सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता उपस्थित राहावे. त्यानंतर परीक्षादालनात सकाळी 11, तसेच दुपारी 3 वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि लेखनास प्रारंभ होणार आहे. परीक्षा सुरू असताना मोबाईल, तसेच समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे काही प्रकार निदर्शनास आले होते.

त्या पार्श्वभूमीवर पेपरफुटीच्या अफवांना प्रतिबंध घालणे, तसेच भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय 10 फेब्रुवारीला घेतला होता. मात्र, विद्यार्थी आणि पालकांमध्ये या निर्णयाविरोधात नाराजी होती. त्यामुळे बुधवारी मंडळाने पुन्हा प्रसिध्दिपत्रक काढून परीक्षेच्या एकूण वेळेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button