सोलापूर : बाप्पांना आज निरोप | पुढारी

सोलापूर : बाप्पांना आज निरोप

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : गेले अकरा दिवस विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पा गणरायाला रविवारी (अनंत चतुर्दशी) भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. यानिमित्ताने घरगुती व गणेश मंडळांच्या मूर्तीचे तलाव, विहिरींसह विसर्जन कुंडांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे.

कोरोना निर्बंधामुळे प्रतिवर्षीप्रमाणे मिरवणुकीतील ढोलताशे, लेझीमसह बेंजो आदीचा दणदणाट मात्र यंदाही पाहायला मिळणार नाही. तसेच मूर्ती विसर्जनही मंडळे किंवा कुटुंबीयांना करता येणार नाहीत. गर्दी टाळण्यासाठी ती जबाबदारीही महापालिकेने घेतली असून, मूर्ती महापालिकेकडेच सुपूर्द करावयाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक महोत्सव आणि जल्लोषाची पर्वणी असणारा बाप्पाचा उत्सव गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे साधेपणाने साजरा होत आहे. यासाठी मंडळांच्या सजावट, डामडौल व देखाव्यांसह मोठेपणाने होणार्‍या खर्चाला शासनाने निर्बंध घातले आहेत. एवढेच नव्हे तर सार्वजनिक दर्शनावरही बंदी घातली होती. त्यामुळे यावर्षीही गणरायाचे साधपेणाने पण भक्तीपूर्ण भावात आगमन झाले होते.

सोबतच गौरी (लक्ष्मी)चेही जल्लोषात आगमन होऊन उत्सव साजरा झाला. गेल्या दीड-पाच, सात तसेच नऊ दिवसांच्या गणरायांचे विसर्जन झाले आहे. अनंत चतुर्थीला उर्वरित घरगुती व मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने तलाव, विहिरी, विसर्जन कुंड अशी शहरात 105 केंद्रे निर्माण केली. तेथे मूर्ती संकलन करून त्याच्या विसर्जनाची तयारी केली. त्यानुसार श्री सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लष्कर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घरकुल मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदींसह शहरातील सुमारे पाचशे मंडळांनी व घरगुती पाच हजार मूर्ती मनपाकडे दिल्या. अनंत चतुर्थीलाही उर्वरित मूर्ती जमा करणार आहेत. त्यामुळे यंदा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर, विद्युत रोषणाई, सजावट, रंगरंगोटी यंदा दिसणार नाही. साधेपणाने रविवारी गणरायाला निरोप देण्यात येणार आहे.

ग्रामीणमध्येही गणेशविसर्जन

जिल्ह्यातील अनेक गावे, ग्रामीण भागातही अनंत चतुर्थीला गणेश मंडळे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन विहिरी, तलावात विसर्जन होणार आहे.

या ठिकाणी होणार विसर्जन

महापालिका प्रशासनाकडून 105 संकलन केंद्रांवर संकलन झालेल्या गणेशमूर्तींचे विधिवतपणे विविध ठिकाणी विसर्जन होणार आहे. सिद्धेश्वर तलाव येथील विष्णू घाट, गणपती घाट, हिप्परगा येथील दगडीखान, रामलिंगनगर येथील विहीर, लक्ष्मी-विष्णू चाळीतील जुनी विहीर, अशोक चौक येथील मार्कंडेय गार्डन येथील विहीर या ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

शहरात आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद अनंत चतुर्दशी म्हणजे आज रविवारी गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरातील हॉस्पिटल, मेडिकल, दूध वितरण केंद्र या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी रात्री जारी केले. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स रविवारी संपूर्णतः बंद राहणार आहेत. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट (मॉल्समधील वगळून) चालू राहतील. या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंडसंहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. त्यामुळे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाचा प्रारंभ 10 सप्टेंबर रोजी झाला. प्रतिष्ठापना सोहळा तसेच विसर्जन सोहळ्यानिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकींना यंदा परवानगी नाकारण्यात आली होती. शिवाय थेट विसर्जनावरही बंदी घालण्यात आली आहे.

Back to top button