नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय युवा पुरस्कार : महाराष्ट्रातील चार युवकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गुरूवारी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे येथील सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी तसेच जळगाव येथील रणजितसिंह राजपूत यांना वर्ष २०१७-२०१८ च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने तर नागपूर येथील सिध्दार्थ रॉय यांना वर्ष २०१८-२०१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते व्यक्तिगत व संस्थात्मक श्रेणींमध्ये वर्ष २०१७-२०१८ आणि वर्ष २०१८-२०१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वयक डियर्ड बॉयडंड उपस्थित होत्या. या कार्यक्रमात वर्ष २०१७-२०१८ साठी १४ तसेच वर्ष २०१८-२०१९ साठी ८ अशा एकूण २२ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
व्यक्तिगत पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र तर संस्थात्मक पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र असे आहे.
या कार्यक्रमात वर्ष २०१७-२०१८ साठी व्यक्तिगत श्रेणीमध्ये १० आणि संस्थांत्मक श्रेणीमध्ये ४ असे एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यक्तिगत श्रेणीमध्ये महाराष्ट्राचा दबदबा दिसून आला.
एकटया महाराष्ट्रातून सौरभ नवांदे, चेतन परदेशी आणि रणजितसिंह राजपूत या तीन युवकांना सन्मानित करण्यात आले.
सौरभ नवांदे यांनी २०१७ मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित 'राष्ट्रमंडळ युवा शिखर संमेलना'त आणि २०१८ मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित 'संयुक्त राष्ट्र सभे'त भारतदेशाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांना महाराष्ट्र शासनानेही 'युथ आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
'एस फॉर स्कुल' या संघटनेच्या माध्यमातून शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे या संस्थेचे संस्थापक, पुणे येथील चेतन परदेशी यांचाही या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
अपरिहार्य कारणामुळे शाळा सोडणाऱ्या १ हजार ९४० विद्यार्थ्यांना या संघटनेने पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महनीय कार्य केले आहे.
जळगाव येथील रणजीतसिंह राजपूत यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. रणजीतसिंह राजपूत यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात विशेष स्वैच्छिक सेवा प्रदान केली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांची भुसावळचे स्वच्छता राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नागपूर येथील सिध्दार्थ रॉय यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी वर्ष २०१८-२०१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
'द स्पेशल फिश' आणि 'राईज इन लव्ह' या पुस्तकांचे लेखक, सिध्दार्थ रॉय यांनी विविध शाळा व अशासकीय संस्थांमध्ये जावून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य केले आहे.
हे ही वाचलं का?