चंद्रपूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या सोडत अनोखे आंदोलन केले. अमृत पाणीपुरवठा योजनेचे अनेक दिवस भिजत घोंगडे पडले आहे. या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज गुरूवारी (12 आॅगस्ट) ला पालिकेच्या इमारतीत कोंबड्या सोडून अनोखे आंदोलन केले.
मागील चार वर्षांपासून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात केंद्र सरकार पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. जलवाहिनीच्या कामासाठी शहराच्या विविध भागात खोदकाम करून ठेवले आहे. या खोदकामामुळे ऐन पावसाळ्यात शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
चंद्रपूर महापालिकेत अनेकदा निवेदने देऊनही अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आलेली नाही. त्यामुळे आज गुरुवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिकेच्या समोर निषेध आंदोलन करून पालिका इमारतीत कोंबड्या सोडून अनोखे आंदोलन केले.
शहरातील नागरिकांना खड्ड्यांपासून मुक्त करा, यासह अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : भारत कोरोनाशी कसा लढणार आहे?