राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला | पुढारी

राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती- जातीचे विष पेरले जात आहे. अलीकडे जातीचा मुद्दा हा त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा बनला आहे. देशाला विचार देणारा महाराष्ट्र आता यूपी- बिहारच्या पातळीवर घसरत चालला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केला.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. राज्यातील आरक्षण व जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरवत सांगितले की, कोण हा जेम्स लेन? ज्याने पुस्तक लिहले? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता काय? आता कुठे आहे तो, कोणी ओळखतंय का त्याला?. पण हे सगळे ठरवून केले गेले.

अमूक जातीच्या लोकांनी लेनला चुकीचा इतिहास व माहिती सांगितल्याचा प्रचार केला गेला. आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे वातावरण तयार केले जाते.

या घटना तत्कालिक असतात पण त्याचे परिणाम भयंकर आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नव्हता तर मग आरक्षणाला कोणाचा अडथळा आहे? मराठा आरक्षणाचा शेवटी खेळच झाला, मी आधीच तसे सांगितले होते.

पण आपल्या देशात काही प्रश्न सुटणे ही समस्या मानली जाते. काही प्रश्न रेंगाळत ठेवल्याने अनेकांची घरे भरतात. जातीचे राजकारण संपल्याशिवाय आपल्याला पुढे जाता जाणार नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Back to top button