अवयवदान चळवळ सध्याच्या तांत्रिक युगात हायटेक झाली आहे. आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कुठे जायची गरज नाही की कोणता फॉर्मही डाऊनलोड करायची गरज नाही. आता केवळ मोबाईलवरून आपण पैसे देण्यासाठी स्कॅन करतो, तसा अवयवदानाचा क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि तुमच्यापुढे अवयदानाचा फॉर्म लगेच हजर होईल. दीड महिन्यांपूर्वी पुण्यात सुरू केलेल्या नवकल्पनेद्वारे आतापर्यंत 245 जणांनी अवयवदानाचा फॉर्म भरला आहे.
अवयवदान चळवळ वाढावी, यासाठी पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) अधिक हायटेक झाली आहे. प्रत्यक्षात जाऊन अर्ज भरून घेणे, इच्छुकांनी संबंधित संस्थेच्या ठिकाणी जाऊन अर्ज भरणे किंवा कॉम्प्युटरवर तो डाऊनलोड करून अर्ज भरणे या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आहेत. पुणे झेडटीसीसीने एक क्यूआर कोड विकसित केला आहे. हा कोड मोबाइलवरून स्कॅन केला असता याद्वारे प्रतिज्ञापत्र भरून घेणे अधिक सोपे झाले आहे.
याआधी छापील स्वरूपातील अर्ज भरून घेतला जात होता. मात्र, तो अर्ज जिथे उपलब्ध असेल तिथे इच्छा असणार्या व्यक्तीला जावे लागत असे. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची सुविधा निर्माण झाली. मात्र, ती लिंक शोधणे, डाऊनलोड करणे, भरणे ही सगळी प्रक्रिया किचकट होती. आता आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच मोबाईलमधील क्यूआर कोड स्कॅनरचा वापर करून, अवयवदानाचे प्रतिज्ञापत्रही क्यूआर कोड स्कॅन करून थेट उघडता येते.
असा करा वापर
मोबाईलमधील स्कॅनर या अॅप्लिकेशनमध्ये जाऊन हा कोड स्कॅन केला असता पुणे झेडटीसीसीची वेबसाईट उघडते. वेबसाईटवरील थेट अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र दिसतेे. त्यामध्ये नाव, वय, जन्मतारीख, मोबाइल नंबर, रक्त गट, फोटो, पत्ता, कोणते अवयव दान करायचे, तातडीच्या वेळी कोणाला संपर्क करायचा… आदी माहिती भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होतो. यानंतर काही मिनिटांतच आपण जो ई-मेल नोंदवला आहे, त्यावर दात्याला लगेचच डोनर कार्डही मिळते. त्यासोबतच युनिक नंबरही मिळतो. कार्ड हरवले, तर या युनिक नंबरच्या सहाय्याने हे कार्ड पुन्हा मिळवता येते.