अफगाणिस्तान : हिंसाचार रोखल्यास सत्तेत स्थान; तालिबानला प्रस्ताव | पुढारी

अफगाणिस्तान : हिंसाचार रोखल्यास सत्तेत स्थान; तालिबानला प्रस्ताव

काबूल : वृत्तसंस्था

अफगाणिस्तान सरकारने तालिबानी दहशतवाद्यांनी हिंसाचार थांबवल्यास त्यांना सत्तेत सहभागी होता येईल, असा प्रस्ताव तालिबानला दिला आहे. कतार येथे तालिबानी प्रतिनिधींसोबत अफगाणिस्तान सरकारच्या अधिकार्‍यांची चर्चा सुरू आहे. युद्ध थांबविण्यासाठी अफगाणिस्तान सरकार तालिबानसोबत असा करार करण्यास तयार झाले आहे.

अफगाणिस्तान मधून अमेरिकन फौजा माघारी जाऊ लागल्यापासून तालिबानने पुन्हा डोके वर काढले होते आणि आता पुन्हा अफगाणिस्तानभोवती तालिबानचा विळखा आवळत चालला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी येथील 10 राज्यांवर नियंत्रण मिळवले असून राजधानी काबूलपासून अवघ्या 150 किलोमीटवर असलेल्या गझनी भागातही आता तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे बिथरलेल्या अफगाण सरकारने तोडग्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यातून सरकारने तालिबानला सत्तेत सहभागाचा प्रस्ताव दिला आहे.

गुरूवारी तालिबानने अफगाणिस्तान मधील दहाव्या राज्याची राजधानी गझनीवर ताबा मिळवला. येथील सर्व सरकारी यंत्रणा आता तालिबानच्या नियंत्रणात आहे. गझनी शहरात तालिबानने चौकाचौकात आपली तरुण मुले तैनात केली आहेत. गझनीपासून राजधानी काबूल केवळ 150 किलोमीटवर आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. तालिबानपासून काबूल तरी सुरक्षित राहील, या आशेने विविध शहरांतून सर्वसामान्य नागरिकांनी काबूलकडे धाव घेतली होती.

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपले राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी परत आणण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या. कडेकोट बंदोबस्तात अमेरिका या अधिकार्‍यांना मायदेशी आणणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाला चिंता

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले की, तेथे तत्काळ आणि व्यापक शस्त्रसंधी व्हावी, अशी आशा आपण करू शकतो. तालिबानसोबत चर्चेसाठी आम्ही सर्व घटकांशी संपर्कात आहोत.

तालिबान्यांचे मुलींशी जबरदस्तीने लग्न

तालिबान्यांच्या क्रूरतेची उदाहरणे समोर येत चालली असून, अनेक युवतींना त्यांचे राहते घर, शहर सोडून पलायन करावे लागत आहे. तालिबानी दहशतवाद्यांशी मुलींची जबरदस्तीने लग्ने लावून दिली जात आहेत.

35 हजार कुटुंबे विस्थापित

अफगाणिस्तानात आतापर्यंत 80 हजारांहून अधिक मुले बेघर झाली असून, 25 प्रांतांमधील 35 हजार कुटुंबे विस्थापित झाली आहेत.

भारतीय हेलिकॉप्टरही ताब्यात

भारताने 2019 मध्ये अफगाणिस्तानच्या हवाई दलाला दिलेली चार एमआय-24 हेलिकॉप्टर्सही आता तालिबानच्या ताब्यात गेली आहेत. या हेलिकॉप्टरचे इंजिन आणि पार्टस् काढून ठेवले होते.

सात दिवसांतील तालिबानचे वर्चस्व

  • 6 ऑगस्ट ः अफगाणिस्तानातील पहिल्या राज्याची राजधानी जरांज येथे तालिबानने ताबा मिळवला
  • 7 ऑगस्ट ः जरांज बळकावल्यानंतर 24 तासांत शबरगान या दुसर्‍या राज्याची राजधानी बळकावली.
  • 8 ऑगस्ट ः सर-ए-पोल शहरावर ताबा. येथे 7 जिल्हे, 896 गावे आहेत. तसेच 4 लाख लोकसंख्या असलेलया कुंदुज
    भागावरही कब्जा. दोन लाख लोकसंख्या असलेल्या तखार प्रांताची राजधानी तालेकान भागावरही वर्चस्व.
  • 9 ऑगस्ट ः ऐबक या सहाव्या राजधानीवर ताबा.
  • 10 ऑगस्ट ः पश्चिम अफगाणस्तानातील सर्वात मोठे शहर फराहवर ताबा. याची सीमा इराणला चिकटून आहे. बघलान प्रांताची राजधानी पुल-ए-खुमरी येथे ताबा.
  • 11 ऑगस्ट ः पामेर प्रांताची राजधानी आणि कमर्शिअल हब असलेल्या फैजाबाद वर ताबा.
  • 12 ऑगस्ट ः काबूल ते कंदहार मार्गावरील महत्वाचे शहर गझनीसह हेरातवरही ताबा.

Back to top button