गायीच्या दुधाचा विक्रीदर कमी का होईना?

गायीच्या दुधाचा विक्रीदर कमी का होईना?

पुणे : पुढारी वृत्तसेवा

खासगी डेअर्‍यांनी गाईच्या दुधाचे खरेदीदर कमी केले आहेत, त्यामुळे दूध खरेदीदर 36 वरून 33 पर्यंत खाली आला आहे. मात्र ग्राहकांसाठीचा विक्रीदर 50 ते 52 रुपयांवर 'जैसे थे' आहे म्हणजेच खरेदीपेक्षा विक्रीदरातील तफावत 17 ते 19 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दूध पावडर आणि बटरचे दर जागतिक बाजारात घटल्याने दूध खरेदीचा दरात घट करण्यात आली. मनमानीपणे दूध खरेदी दर कमी करताना ग्राहकांसाठीचे विक्रीदर कमी करण्यावर खासगी डेअर्‍यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यावर बोलण्यास कोणीच तयार नसल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.

गायीच्या 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाचे खरेदी दर प्रति लिटरला 36 रुपये आणि विक्री दर 50 ते 52 रुपयांवर नेण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आतापर्यंत होत होती. या संघाची बैठक न घेताच खासगी डेअर्‍यांनी स्वतःच खरेदी दर तीन रुपयांनी कमी करीत 33 रुपये केले आहे. म्हणजेच कल्याणकारी संघासह सहकारी दूध संघांनाही वार्‍यावर सोडण्यात आले असून, कल्याणकारी संघ यामध्ये कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे राहील.

दुसरीकडे दुधाचा विक्रीचा दर कायम ठेवला आहे. म्हणजेच खरेदी दर कमी करून शेतकर्‍यांचा खिसा कापला जात असताना विक्रीचा वाढीव दर ठेवून ग्राहकांच्या खिशालाही भुर्दंड दिला जात आहे. त्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याने खरेदीपेक्षा 17 ते 19 रुपयांनी विक्रीदर अधिक असल्याने ही तफावत अवाजवी ठरत असल्याची टीका सुरू झाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news