

पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री चिन्मयी साळवी आता मराठी रुपेरी पडदयावर पदार्पण करणार आहे. आगामी 'येरे येरे पावसा' या चित्रपटामध्ये तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.
'तू माझा सांगाती', 'छोटी मालकीन', 'नवरी मिळे नवऱ्याला' अशा मराठी मालिकांमधून आणि आता 'वागले की दुनिया' या हिंदी मालिकेतून ती घराघरांत पोहचली होती. 'येरे येरे पावसा' या चित्रपटात अंजली ही व्यक्तिरेखा चिन्मयी साकारत आहे. चित्रपटातील माझ्या भूमिकेला प्रेमाची वेगळी किनार आहे, जी प्रत्येकाला स्पर्शून जाणारी असेल, असं ती सांगते.
कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना चित्रपटातील या भूमिकेसाठी मला विचारणा झाल्याचं ती सांगते. प्रत्येकाला चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर काम करायची इच्छा असते. 'येरे येरे पावसा'च्या निमित्ताने माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना काही तरी सांगू पाहणारा हा चित्रपट प्रत्येकाने नक्की पहायला हवा असं ती सांगते.
नृत्यनिपुण आणि अभिनयाची आवड असणाऱ्या चिन्मयीने दूरदर्शन वाहिनीवरील 'दम दमा दम', ई टीव्ही मराठी वाहिनीवरील फूल टू धमाल, कलर्स मराठी वाहिनीवरील 'ढोलकीच्या तालावर' यासारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारत आपला वेगळा ठसा उमटवला होता.
'येरे येरे पावसा' या चित्रपटात चिन्मयी सोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.
'एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी' यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली आहे. संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत.
अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.
हेदेखील वाचा-