कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळी सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असताना, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने सोयाबीन कापणीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे आधीच शेतकऱ्याची फसवणूक झाली असताना, हे दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. वादळी पावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
काही दिवसांतच सोयाबीन कापणी होऊन काहीतरी आर्थिक हातभार लागेल या आशाने शेतकऱ्यांच्यात उत्साह संचारला होता. पण अचानक सुरू झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्याच्या चेहऱ्यांवर निराशा दिसत आहे. शिरोळ तालुक्यात सोयाबीनच्या बोगस बियाणांचा सुमारे 400 हेक्टरहुन अधिक शेतीला फटका बसला आहे. पेरा केलेल्या सोयाबीनच्या रोपांची उंची वाढली, शेंगा लागल्या, त्या गळून पडल्या तर काही रोपांना शेंगाच लागल्या नाहीत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतीवर रोटर फिरवत संताप व्यक्त केला आहे.
सोयाबीन बियाणांच्या फसवणुकीमुळे एकरी २० ते २२ क्विंटल उतारा पडेल असे सांगितले होते. मात्र एकरी 7 ते 8 क्विंटल उतारा पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली होती. अशातच ऐन मळणी दरम्यान पाऊस पडत असल्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन शेंगात पाणी राहिल्याने शेंगा काळ्या पडून, त्याला कोंब येण्याची भीती असल्याने सोयाबीन कापणी करून ठेवलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
कुरुंदवाड-शिरोळ रस्त्यावर साडे तीन एकरात सोयाबीन पेरा केला होता. याला ४५ हजार रुपये इतका खर्च आला होता. चांगली खते व मशागत केली होती. एकरी २२ क्विंटल उतारा पडेल, असा विश्वास होता. कापणी करून ठेवली होती. पण अचानक झालेल्या पावसाने शेंगा काळ्या पडून, त्यातून कोंब उगवून नुकसान होणार असल्याने आमचा जीव मेटाकुटीला आला आहे.
-बाबासाहेब गायकवाड (शेतकरी )