पाटपाण्यासाठी सामूहिकरित्या लढा महत्त्वाचा | पुढारी

पाटपाण्यासाठी सामूहिकरित्या लढा महत्त्वाचा

महेश जोशी 
 काळापरत्वे निर्माण होणार्‍या प्रश्नाला एकच उत्तर होते, ते म्हणजे पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे आणि त्याचा पाठपुरावा स्व. कोल्हे यांनी केला. सरकार आपले असले, तरी त्याविरूध्द धडका घेत पाटपाण्याची लढाई सुरूच ठेवली आहे.
वयाच्या 93 व्या वर्षापर्यंत ते पाण्यासाठी लढत राहिले.  त्यांच्या प्रयत्नांतून आताच्या सरकारने सन 2022 मध्ये या मागणीवर प्रत्यक्ष काम करायला सुरूवात केली आहे.
वैतरणेचे समुद्राला वाहून जाणारे दीड टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात मुकणे धरणात घेण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. मुकणे सॅडल डॅममधून थेट 20 टीएमसी पाणी वाहू शकेल, अशा पध्दतीचे बांधकामाचे नियोजन सध्या सुरू आहे. भविष्यात जास्तीचे पाणी वळण बंधार्‍याच्या माध्यमातून तुटीच्या गोदावरी खोर्‍यात येणार असल्याने त्याचे प्रारूप नियोजन सध्या सुरू आहे. त्यामुळे माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारले जात आहे.
नगर-नाशिक विरुध्द मराठवाडा असा प्रादेशिक पाण्याचा वाद सध्या सुरू आहे. त्यात सन 2005 मध्ये विधिमंडळात तत्कालीन आमदार अशोक काळे यांच्या कार्यकाळात समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत झाला. त्यातच सिन्नर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडिया बुल्स या प्रकल्पाची झळ नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, येवला, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद अशा 9 तालुक्यांना बसली आहे. उर्ध्व गोदावरी खोर्‍याच्या तुटीच्याच पाण्याचे वाटप सातत्याने होताना दिसत आहे. मराठवाड्यातील आमदार, खासदार, तत्कालीन आजी-माजी मंत्री यांनी कायद्याने उर्ध्व गोदावरी खोर्‍याच्या पाण्यावर हक्क सांगितला. पण प्रत्यक्षात पाणी वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाही.
हे आजवरच्या अभ्यासातून दिसून येते. औरंगाबाद कॉरिडॉरसाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. माजीमंत्री स्व. कोल्हे यांनी उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील कडवा, वाघाड, आळंदी, पालखेड, काश्यपी, गोदावरी गौतमी, वालदेवी तर मराठवाड्याच्या नांदूरमध्यमेश्वर जलद कालवा प्रकल्प अंतर्गत मुकणे, भाम, भावली आणि मुकणे उंची वाढ या धरणांची कामे हाती घेवून ती पूर्ण केली व नाशिक शहरासाठी किकवी धरणाचे सर्वेक्षण हाती घेत, वाकी धरणाच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला होता.
नगर-नाशिक विरुध्द मराठवाडा हा प्रादेशिक वाद थांबावा, यासाठी स्व. कोल्हे यांनी जीवाचे रान केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीनराव कोल्हे यांनी पाटपाणी सिंचनाचा अभ्यास सुरू केला आहे.
तुटीच्या उध्वर्र् गोदावरी खोर्‍यात पाण्याची समृध्दी वाढविण्यासाठी पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी 30 वळण बंधार्‍याच्या माध्यमांतून जास्तीचे पाणी उपलब्ध होणार आहे. तर पार ते गोदावरी नदीतून चार टीएमसी, दमणगंगा, वैतरणा, गोदावरीतून सात टीएमसी, दमणगंगा एकदरे ते गोदावरीतून पाच टीएमसी आणि पिंजाळ दमणगंगा ते उर्ध्व वैतरणा गोदावरी यातून दहा टीएमसी पाणी तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्‍यात आणण्यासाठी कार्यवाही सुरू झालेली आहे.
पश्चिमेच्या वैतरणा, तानसा, काळू, शाही, पिंजाळ, भातसा, उल्हास आदी नद्या पाण्याने समृध्द आहे. त्यांचे पाणी तुटीच्या खोर्‍यात आणल्याशिवाय गोदावरीचे लाभक्षेत्र पुन्हा सुजलाम् सुफलाम् होणार नाही. त्यासाठी भगिरथ प्रयत्न आणि निधीची नितांत गरज आहे. पाटपाण्याचा लढा हा एकट्याचा नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. स्व. कोल्हे यांचा वारसा आता विवेक कोल्हे चालविणार आहेत.

Back to top button