चंद्रपूर : रेल्‍वेच्या धडकेत मादी अस्‍वलाचा मृत्‍यू | पुढारी

चंद्रपूर : रेल्‍वेच्या धडकेत मादी अस्‍वलाचा मृत्‍यू

चंद्रपूर; पुढारी वृत्‍तसेवा : आपल्या अस्तित्व क्षेत्रात भटकंती करणाऱ्या एका मादी अस्‍वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.

सदर घटना मूल नियतक्षेत्रात रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.

ही मादी अस्वल अंदाजे तीन वर्षाचे होते. जबर धडक बसल्याने रेल्वे ट्रॅक शेजारी हे अस्वल मृत्यूमुखी पडून होते.

सकाळी वनविभागाच्या गस्ती दरम्यान ही घटना उघडकीस आली. नुकतेच मूलमध्ये वनविभागाच्या परिसरात भरकटलेल्या एका अस्वलाला जेरबंद करण्यात आले होते.

त्या अस्वलाची पिल्ले होती. या अस्वलाचा संचार कर्मवीर महाविद्‍यालयाच्या पटांगणात, रेल्वे स्टेशन परिसर, चरखा संघ आणि उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात नियमित होता.

दररोज तिचे नागरिकांना दर्शन होत होते. मानवी वस्ती परिसरात भटकत असताना देखील या अस्वलाने आजपर्यंत कोणालाही इजा पोहोचवली नव्हती हे विशेष!

रविवारी पहाटे आपल्या नियत क्षेत्रात रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना मूल मार्गे गोंदीयाकडे जाणा-या मालगाडीची धडक अस्वलाला बसली.

मूल चिचोली गावाजवळ रेल्वे लाईन पिलर क्रमांक 1198/9 जवळ ही अस्वल पडून होती. शेपटी जवळ आणि मागील डाव्या बाजूच्या पाया जवळ गंभीर जखमा अस्वलाला झालेल्या होत्या.

वनविभागाने घटनास्थळी धाव घेवून मौका पंचनामा केला.

मृत अस्वलीला शवविच्छेदनाकरीता चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे नेण्यात आले.

अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत दुदैवी मृत्यू प्रकरणी येथील वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

या आधीही एका अस्वलीसह तीन पिल्लांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना केळझर वनविभागाच्या हद्दीत घडली.

मूल पासून जाणारा गोंदीया बल्लारपूर रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जात असल्याने रेल्वेची धडक बसून पट्टेदार वाघ, अस्वल आणि इतर वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना या आधीही घडलेल्या आहेत.

Back to top button