दुधोंडी – वसंतनगर (ता. पलूस) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याच्या वादातून दोन गटांत राडा झाला. शस्त्रे, लोखंडी पाईप, काठ्यांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये तिघांचा खून झाला, तर तिघेजण गंभीर झाले. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही थरारक घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सनी आत्माराम मोहिते (वय 27), अरविंद बाबुराव साठे (45), विकास आत्माराम मोहिते (32, सर्व रा. दुधोंडी, ता. पलूस) अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत. या हल्ल्यात संग्राम विकास मोहिते (वय 17), आकाश आत्माराम मोहिते (28), दिलीप आनंदा साठे (42, सर्व रा. दुधोंडी, ता. पलूस) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे; मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचे नाव समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळ आणि कुंडल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी (दि. 31 जुलै) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यावरून दोन गटांत किरकोळ वाद झाला होता. याबाबत कुंडल पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.
खोटी तक्रार का दिली, या कारणावरून रविवारी दुपारी संशयित प्रवीण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगीता मधुकर मोहिते हे सहाजण जाब विचारण्यासाठी एका गटाकडे गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला.
संशयितांनी 'आमच्याच लोकांना तुम्ही मारहाण करून खोटी तक्रार का दिली', असे म्हणत दुसर्या गटातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या मारामारीत संशयितांनी धारदार शस्त्रे, लोखंडी पाईप, काठ्या घेत 'तुम्हाला मस्ती आली आहे.
आता जिवंत सोडणार नाही', असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते यांच्या छाती, पोटावर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खालीकोसळले. यावेळी सर्व संशयितांनी त्या ठिकाणाहून पलायन केले.नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी सर्व जखमींना पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकार्यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागून अतिरक्त स्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. मारामारीत वापरलेली हत्यारे, दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. इतर जखमींवर सांगली येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत स्वप्निल अरविंद साठे यांनी कुंडल पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दोघा सख्ख्या भावांसह मामाचा मृत्यू
दुधोंडी येथील झालेल्या हल्ल्यात मृत झालेले सनी मोहिते आणि विकास मोहिते हे सख्खे भाऊ होते. तर अरविंद साठे त्यांचे मामा आहेत. दोन कुटुंबातील तिघांचा मृत्यू आणि तिघे गंभीर असल्यामुळे घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.
पूर्वीच्या वादाचीही गावात चर्चा
दुधोंडी येथे रविवारी झालेल्या दोन गटांतील राड्यापाठीमागे यापूर्वी झालेल्या वादाचीही चर्चा आहे. या दोन गटांत पूर्वी काही कारणांतून वाद झाला होता. तो वाद पुन्हा रविवारी उफाळून आला. त्यामुळे सशस्त्र राडा झाला, अशी चर्चा गावात होती. पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला असून याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.