सोलापूर : ट्रक-अल्टोच्या भीषण अपघातात दाम्पत्य जागीच ठार | पुढारी

सोलापूर : ट्रक-अल्टोच्या भीषण अपघातात दाम्पत्य जागीच ठार

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर अकोले बु.पाटी जवळ ट्रक व अल्टो कारच्या भीषण अपघातात अल्टो मधील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर या दाम्पत्याचा नातू गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ४ ) दुपारी घडली. मृत पती-पत्नी टेंभुर्णीचे रहिवाशी आहेत. गोरख मारुती माने (वय ४५) व ताई गोरख माने (वय ४०, रा. टेंभुर्णी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोरख मारुती माने व त्यांची पत्नी ताई गोरख माने वय हे दोघे आपल्या आल्टो कार यामधून पंढरपूरहुन नातू अनमोल यास घेऊन टेंभूर्णीकडे येत होते. दरम्यान, ते अकोले बु.येथे आले असता  समोरून पंढरपूरकडे जाणाऱ्या मालट्रकने  ने अल्टो कारला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार मधील गोरख माने व ताई माने हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांचा नातू अनमोल माने (वय ०२) हा चिमुकला सुदैवाने बचावला. त्यास पायास गंभीर जखम झाली आहे. त्याच्यावर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात कारचा संपूर्ण चुराडा झाला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्वतः धाव घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मयतांना टेंभुर्णी येथे पाठवून देऊन रस्त्यावरील वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. अपघातात मरण आलेले माने पती-पत्नी हे नातू अनमोल याचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी अनमोल यास आणण्यास पंढरपूरला गेले होते. मात्र परतीच्या प्रवासात वाटेतच टेंभुर्णी जवळ त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातूचा वाढदिवस साजरा करण्याचे माने दाम्पत्यांचे स्वप्न अधुरे राहिले. माने दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने टेंभुर्णीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button